होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये 3 पोलिसांवर गुन्हा

इस्लामपूरमध्ये 3 पोलिसांवर गुन्हा

Published On: Sep 03 2019 1:45AM | Last Updated: Sep 03 2019 1:45AM
इस्लामपूर : वार्ताहर
इस्लामपूर पोलिस ठाण्यातील जप्‍त मुद्देमालात 5 लाख 88 हजार 990 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तीन पोलिसांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे तिघेही यापूर्वी पोलिस ठाण्यात अव्वल कारकून म्हणून कार्यरत होते. याप्रकरणी सध्याचे कारकून चंद्रकांत शिवाजी कुंडले यांनी फिर्याद दिली आहे. 

सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी बी. एस. जाधव, बी. एस. साळुंखे, एस. आर. यादव अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही दि. 1 जानेवारी 1990 ते दि. 15 मार्च 2017 या कालावधीत इस्लामपूर पोलिस ठाण्यात कारकून म्हणून काम करीत होते. यादरम्यान, पोलिसांनी जप्‍त केलेल्या मुद्देमालात अफरातफर झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

या तिघांच्या कार्यकाळात जप्त केलेला मुद्देमाल नोंदवहीप्रमाणे पोलिस ठाण्यात आढळून आलेला नाही. यामध्ये रोख रक्‍कम व इतर वस्तूंचा समावेश आहे. या मुद्देमालाची निर्गती केल्याची व न्यायालयात तसेच कोषागारात जमा केल्याचीही नोंदवहीत नोंद दिसून येत नाही. तसेच रोख रक्‍कम किंवा हा किमती मुद्देमाल कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे या मुद्देमालाचा अपहार झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे कारकून चंद्रकांत कुंडले यांनी  फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नारायण देशमुख करीत आहेत.
इस्लामपूरात अशा प्रकारचा गुन्हा पहिल्यांदाच दाखल झाला आहे.   त्यांनी किती माल लंपास केला, हे तपासात उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.