इस्लामपूर : अशोक शिंदे
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व खासदार राजू शेट्टी यांच्यातील राजकीय संघर्ष वाढत आहे. त्यातच खासदार शेट्टी यांनी काँगे्रसशी केलेली जवळीक आणि त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे वाळवा-शिराळा तालुक्यांच्या राजकीय वर्तुळात परंपरेला छेद देऊन किमान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ‘नवी राजकीय जुळणी’ आकाराला येण्याची चिन्हे आहेत. काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीमुळे शेट्टी आगामी लोकसभा निवडणुकीत काँगे्रस आघाडीसोबत राहण्याची दाट शक्यता आहे.
याआधी त्यांनी राष्ट्रवादीशी संघर्ष करताना सुरुवातीस काँगे्रसशी आणि नंतर भाजपशी सलगी केल्याचा व दलबदलूपणाचा आरोप शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेकडून झाला आहे.वाळवा-शिराळा दोन्ही तालुक्यात आणि विधानसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाला आणि अर्थातच राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भाजप, रयत क्रांती, नानासाहेब महाडिक गट, काँगे्रस, शिवसेना, हुतात्मा उद्योग समुह असे अनेक प्रवाह आपापल्यापरीने प्रयत्नशील राहतात.
शिराळा विधानसभा मतदारसंघात आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख असे तीन स्वतंत्र राजकीय प्रवाह आहेत. महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य राहुल महाडिक व युवा नेते सम्राट महाडिक यांचीही दोन्ही मतदारसंघातून चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जाते. त्याचवेळी जयंतरावांविरोधात नगराध्यक्ष निशिकांत पाटील आक्रमक आहेतच.
आता राज्यात भाजपला थोपविण्यासाठी काँगे्रस-राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास त्यांची ‘ऑफर’ शेट्टी यांना मिळाल्यास आश्चर्य वाटू नये. गेल्याखेपेस भाजपने या परिसरातील लोकसभेची जागा शेट्टी यांच्यासाठी सोडली होती. काँगे्रस- राष्ट्रवादी- स्वाभिमानी आघाडी झाल्यास वाळवा तालुक्यात महाडिक गटाची भूमिका हा औत्सुक्याचा विषय ठरेल. त्याचबरोबर प्रामुख्याने इकडे शिराळा तालुक्यात लोकसभेला ‘वरच्या’ निर्णयाप्रमाणे मानसिंगराव नाईक व सत्यजित देशमुख हे भाजप-सेनेच्या संभाव्य उमेदवाराच्या विरोधात राहतील. पण याआधी खासदार शेट्टी यांच्याबरोबर सतत असणार्या आमदार शिवाजीराव नाईक यांच्या भूमिकेकडे मात्र सर्वांचे लक्ष राहणार आहे.
Tags : Sangli, Sangli News, new political connection in Walva Shirala, Congress, Raju Shetty, Rahul Gandi, Parliament Election,