होमपेज › Sangli › सांगलीवाडीतून बेपत्ता झालेल्या सुरेश सुतार यांचा खून

सांगलीवाडीतून बेपत्ता झालेल्या सुरेश सुतार यांचा खून

Published On: Mar 25 2018 11:47AM | Last Updated: Mar 26 2018 12:16AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीवाडी येथून दि. 13 मार्चपासून बेपत्ता झालेल्याचा विजापूर (कर्नाटक) येथे खून झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. सुरेश संगाप्पा सुतार (वय 48, रा. वाटेगावकर प्लॉट, सांगलीवाडी) असे मृताचे नाव आहे. पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून सुतार यांची फसवणूक करून अज्ञातांनी त्यांचा खून केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

याप्रकरणी विजापूर येथील आदर्शनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नातेवाईक मृतदेह घेण्यासाठी विजापूरला रवाना झाल्याचे सांगण्यात आले. 

सुतारकाम करणारे सुरेश सांगलीवाडीतील वाटेगावकर प्लॉट येथे कुटुंबासमवेत राहात होते. दि. 13 रोजी दुपारी त्यांना एकाचा मोबाईलवर फोन आला. काम होत असेल तर लगेच  येतो, असे सुरेश त्यावेळी म्हणाले.

त्यानंतर ते घरात कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले होते. दोन दिवस ते घरी न आल्याने नातेवाईक तसेच मित्रांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला;मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे दि. 16 रोजी नातेवाईकांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. 

दरम्यान, दि. 14 रोजी सकाळी विजापूर-सोलापूर रस्त्यावरील एका शाळेच्या परिसरात अनोळखी मृतदेह असल्याची माहिती आदर्शनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृताच्या डोक्यात धारदार शस्त्राचे घाव घालून खून करण्यात आल्याचे उत्तरीय तपासणीत स्पष्ट झाले आहे. मात्र ओळख न पटल्याने विजापूर पोलिसांनी मृतदेह दफन केला . 

दरम्यान सुतार बेपत्ता झाल्यापासून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरूच ठेवला होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गतीने होत नसल्याने नातेवाईकांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर शनिवारी रात्री शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रोहित चौधरी यांनी विजापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेशी संपर्क साधून सुतार यांचे छायाचित्र मोबाईलवरून विजापूर पोलिसांना पाठविले. त्यानंतर तेथील पोलिसांनी थेट मृतदेहाची छायाचित्रेच चौधरी यांना पाठविली. त्यानंतर तो मृतदेह सुतार यांचाच असल्याची शहर पोलिसांची खात्री पटली. 

पोलिसांची खात्री पटल्यानंतर रविवारी सकाळी सुतार यांच्या मुलासह नातेवाईकांना पोलिसांच्या पथकासोबत विजापूरला पाठविण्यात आले. मुलाने तो मृतदेह वडील सुरेश सुतार यांचा असल्याचे सांगितले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 

याप्रकरणी विजापूर येथील आदर्शनगर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुतार यांचा खून नेमका कोणत्या कारणासाठी करण्यात आला याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पैशाच्या तगाद्याने खून

दरम्यान जादूटोणा, अंधश्रद्धेतून पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष चांदने त्यांना दाखविल्याचा संशय आहे. त्यासाठी सुतार यांच्याकडून संशयितांनी सुमारे चार ते पाच लाख रूपये घेतले होते. तसे शहर पोलिसांच्या तपासातही निष्पन्न झाले आहे. मात्र काम न झाल्याने सुतार यांनी चांदकडे पैशांसाठी तगादा लावला होता. यातूनच त्यांचा खून झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.