Sun, Jul 05, 2020 16:54होमपेज › Sangli › दुष्काळग्रस्तांना सरकार भरपाई देणार 

दुष्काळग्रस्तांना सरकार भरपाई देणार 

Published On: Dec 11 2018 1:47AM | Last Updated: Dec 10 2018 11:32PM
सांगली : प्रतिनिधी 

दुष्काळ मदतीसाठी 7 हजार 900 कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. हे पॅकेज आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून दुष्काळामुळे नुकसान झालेल्यांना मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली. 

ते म्हणाले,  दुष्काळाबाबत सरकार गंभीर आहे. आतापर्यंत दुष्काळ हा फेब्रुवारी, मार्चमध्ये जाहीर केला जात होता. मात्र आमच्या सरकारने ऑक्टोंबरपासूनच मदत आणि तयारी सुरू केली आहे. केंद्रीय पथकाने दुष्काळी भागाची पाहणी केली. या पथकाबरोबर मुख्यमंत्री, महसूलमंत्री आणि मी चर्चा केली. दुष्काळाची गंभीरता त्यांना सांगितली. त्याप्रमाणे 7 हजार 900 कोटीचा आरखडा तयार करुन केंद्राकडे पाठवला आहे. ही मदत मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्राबरोबर चर्चा करीत आहेत. लवकरच  ही मदत मिळेल. 

ते म्हणाले, दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना विमा कंपन्याकडून भरपाई मिळेल. त्या शिवाय केंद्र आणि राज्य सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. दुष्काळातील उपाययोजनाबाबत प्रांताधिकार्‍यांना अधिकार देण्यात आले आहेत. मदत देण्याबाबत अटी आणि नियमात शिथिलता देण्यात आली आहे. पाणी आणि चारा टंचाईचा प्रश्‍न सोडवण्यासाठी मागणी आल्यानंतर आवश्यक तेथे 24 तासाच्या आत टँकर देण्यात येणार आहे. चारा छावणीबाबत अशी भूमिका सरकारची राहील. यंदाचा दुष्काळ हा 1972 पेक्षा गंभीर आहे. त्यामुळे टँकर सुरू करण्याबाबत कुचराई केली जाणार नाही. जिल्ह्यातील टंचाईचा आढावा घेऊन संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील आठवड्यात तालुकानिहाय बैठका घेऊन आढावा घेण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, इस्लामपूर येथे 9 ते 13 जानेवारी काळात कृषी प्रदर्शन होणार आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय येडेनिपाणी येथील पांडुमास्तर यांच्या स्मारकाचे आणि क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालयाचे भूमिपजून त्यांच्या हस्ते होणार आहे.