Fri, Jul 10, 2020 19:11होमपेज › Sangli › कुपवाडमधील टोळीला ‘मोका’

कुपवाडमधील टोळीला ‘मोका’

Published On: Jun 15 2019 1:51AM | Last Updated: Jun 14 2019 11:51PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांत गंभीर गुन्ह्यांची मालिका रचून दहशत माजविलेल्या कुपवाडमधील गुंड  राहुल माने टोळीविरुद्ध शुक्रवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कारवाईचा बडगा उगारण्यात  आला. टोळीत सहा जणांचा समावेश आहे. 

‘मोका’ लागलेल्यांमध्ये राहुल सुभाष माने (वय 24), पिल्या ऊर्फ महेश आनंदा पारचे (23), विकी ऊर्फ शामराव भाऊसाहेब हजारे (27), त्यागी ऊर्फ राहुल ऊर्फ प्रशांत पंकज भगत (20), सचिन महादेव माने (24), प्रकाश बाबुराव जहान्‍नावर (सर्व रा. कुपवाड) यांचा समावेश आहे. 

बुधगाव (ता. मिरज) येथील माळभागात राहणारे अक्षय जगताप (23) हे 24 एप्रिल रोजी मित्रांसमवेत कुमठे फाट्यावर हॉटेलमध्ये जेवणास गेले होते. त्याचवेळी राहुल माने टोळीही तिथे आली होती. जेवण केल्यानंतर जगताप मित्रांसमवेत हॉटेलमधून बाहेर पडून पान दुकानात गेले होते. त्यावेळी माने व त्याच्या टोळीतील सदस्य जगताप व त्याच्या मित्रांकडे रागाने पाहत उभे राहिले; पण जगताप यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. पान घेऊन ते बुधगावला जाण्यास निघाले. तेवढ्यात माने टोळीने जगताप व त्यांच्या मित्रांना ‘तुम्ही आमच्याकडे रागाने हा पाहिला’, असे म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. जगताप यांना चाकूने भोसकले, तसेच त्यांच्या मित्रांना दगडाने मारहाण केली होती.

याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात माने टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटकही केली होती. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढून मोक्का कायद्यांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचा आदेश दिला होता. मिरज ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी प्रस्ताव तयार करुन तो शर्मा यांना सादर केला. शर्मा यांनी या प्रस्तावाचे अवलोकन करुन तो मंजूरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांना सादर केला होता. वारके यांनी शुक्रवारी प्रस्तावास मंजूरी दिली. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस उपअधीक्षक संदीपसिंग गिल तपास करीत आहेत.

खुनासह १७ गुन्हे

टोळीविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण, जीवघेणा हल्ला करून लुटणे, दरोड्याचा प्रयत्न यासह एकूण 17 गुन्हे कुपवाड एमआयडीसी, संजयनगर, सांगली शहर, विश्रामबाग मिरज शहर, जत तसेच हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.