होमपेज › Sangli › मदने-शिंदे टोळीवर ‘मोका’ न्यायालयात दोषारोपपत्र

मदने-शिंदे टोळीवर ‘मोका’ न्यायालयात दोषारोपपत्र

Published On: Jul 16 2019 2:00AM | Last Updated: Jul 16 2019 2:00AM
इस्लामपूर : शहर वार्ताहर

खून, खुनी हल्‍ले, खंडणी अशा गंभीर प्रकरणातील अनमोल मदने व सोन्या शिंदे टोळीतील नऊ जणांवर सोमवारी ‘मोका’ न्यायालयात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. ही  माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली. सहा महिन्यांपूर्वी या टोळ्यांना ‘मोका’ लावला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. इस्लामपूर परिसरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वर्तुळात पुढे असलेल्या येथील अनमोल मदने टोळीवर तब्बल 13 गंभीर गुन्हे  दाखल आहेत.  सोन्या शिंदे टोळीवर 24 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 

 मदने टोळीने दि. 6 जानेवारी 2019 रोजी मोमीन मोहल्ल्यातफैजान पीरअली पुणेकर (वय 21, रा. मोमीन मोहल्ला) याच्यावर कोयत्याने हल्‍ला करून 2 लाख रुपयांची मागणी केली होती. त्याच्या खिशातील 42 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. 

याप्रकरणी अनमोल मानसिंग मदने (वय 21, रा. किसाननगर, इस्लामपूर) , गुरूसिद्ध लक्ष्मण जाधव (वय 26, रा. टकलाईनगर इस्लामपूर), रविराज श्रीरंग चौगुले (वय 29, रा. मांगले, सध्या रा. वारणानगर कोडोली, ता. पन्हाळा) यांच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात पुणेकर याने फिर्याद दिली होती. संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. 

 मदने टोळीवर सन 2013 ते 2019 पर्यंत या सहा वर्षांत खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारामारी, खंडणी, अपहरण, दुखापत करणे, अवैध हत्यार बाळगणे, धमकी देणे, शिवीगाळ असे 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. 
दि.15 जानेवारी 2019 रोजी सोन्या शिंदे टोळीने येथील व्यावसायिक जितेंद्र ज्ञानदेव परदेशी यांच्यावर 40 हजारांच्या खंडणीसाठी कोयत्याने खुनी हल्‍ला केला होता. 

टोळीतील सोन्या उर्फ सोनम बाळासाहेब शिंदे (वय 33, रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर), मुज्या उर्फ मुजमील रमजान शेख (वय 25, रा.नालबंद कॉलनी, इस्लामपूर), जयेश बाबुराव माने (वय 29, रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर), नितीन संजय पालकर (वय 27, रा. मंत्री कॉलनी इस्लामपूर), वैभव विक्रम पाटील (रा. कापूसखेड नाका इस्लामपूर), सुरज सुभाष बाबर (वय 23, रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर) यांना इस्लामपूर पोलिसांनी अटक केली होती.शिंदे टोळीवर सन 2009 ते 2019 पर्यंत या 10 वर्षात खून, खूनाचा प्रयत्न, बेकायदेशीर जमाव जमविणे, खंडणी, दुखापत, अपहरण, फसवणूक, अवैध हत्यार बाळगणे, सावकारकी, धमकी, शिवीगाळ असे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

या दोन्ही टोळ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 चे कलम 3(1), (ळळ)3(2), 3(4), 3(5) या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. अप्पर पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे गुन्ह्याची कागदपत्रे पाठविण्यात आली होती. त्यांनी पुणे येथील मोका न्यायालयात आरोपीविरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यास मंजुरी दिली. त्यानुसार सोमवारी सोन्या शिंदे, अनमोल मदने टोळीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. 

वाळवा-शिराळ्यात गुन्हेगारांचे धाबे दणाणले...

सहा महिन्यांपूर्वी शहरात फाळकूटदादांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे.कृष्णात पिंगळे यांनी इस्लामपूरच्या पोलिस उपअधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच ‘मोका’ कारवाईचा धडाका लावला. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात ‘मोका’च्या 11 कारवाया  झाल्या आहेत. त्यामध्ये इस्लामपूर उपविभागाच्या पाच कारवायांचा समावेश आहे. या कारवाईमुळे शहरासह तालुक्यातील गुन्हेगारी वर्तुळाचे धाबे दणाणले आहे.