Sun, Jul 05, 2020 16:39होमपेज › Sangli › सांगलीत विवाहितेची गळफासाने आत्महत्या

सांगलीत विवाहितेची गळफासाने आत्महत्या

Published On: May 16 2019 2:11AM | Last Updated: May 16 2019 12:21AM
सांगली : प्रतिनिधी

शहरातील वारणालीतील विद्यानगर येथे राहणार्‍या एका विवाहितेने घरातील तुळईला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दीपाश्री सागर ओलेकर (वय 22) असे मृत महिलेचे नाव आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान सासरच्या लोकांनी तिचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

दीपाश्री यांचे बल्लोळी (ता. इंडी, विजापूर) माहेर आहे. 2012 मध्ये तिचा विवाह सांगलीतील सागर ओलेकर यांच्याशी झाला होता. तिचा पती सागर मेडिकल दुकानात कामाला आहे. दीपाश्री पती, सासू, सासरे, दोन नणंदा यांच्यासमवेत वारणालीत रहात होती. तिला दीड वर्षांचा मुलगा आहे. 

मंगळवारी मध्यरात्री दीपाश्री हीने घरात साडीने तुळईला गळफास घेवून आत्महत्या केली. सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. याबाबत संजयनगर पोलिसांत कळविण्यात आले. पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

दीपाश्रीने आत्महत्या केल्याचे समजल्यानंतर तिच्या माहेरील नातेवाईक तातडीने सांगलीकडे धावले. सासरच्या लोकांवर घातपाताचा आरोप करत सांगलीतील शासकीय रूग्णालय परिसरात त्यांनी ठिय्या मारला होता. सकाळी दहापासून रात्री उशीरापर्यंत नातेवाईक सांगलीतील शासकीय रुग्णालय परिसरात गर्दी करून होते. नातेवाईकांनी आरोप केल्याने पोलिसांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी मिरजेतील शासकीय महाविद्यालयात इन कॅमेरा केली.रात्री उशीरापर्यंत सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.