Tue, Jul 14, 2020 01:33होमपेज › Sangli › पूरग्रस्त अनुदानासाठी महाजनादेश यात्रा रोखू : शिवसेनेचा इशारा

पूरग्रस्त अनुदानासाठी महाजनादेश यात्रा रोखू : शिवसेनेचा इशारा

Published On: Sep 15 2019 1:00AM | Last Updated: Sep 15 2019 12:23AM
सांगली : प्रतिनिधी

पूरग्रस्तांना खात्यावर 10 हजार रुपये, भत्ते आणि व्यापार्‍यांना 50 हजार रुपये देण्याची शासनाने घोषणा केली. परंतु अद्याप ते खात्यावर जमा झाले नाहीत. ते अनुदान तत्काळ द्यावे, अन्यथा शहरातील पूरग्रस्त नागरिक, व्यापार्‍यांसमवेत मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रोखू, असा इशारा शिवसेनेचे नेते शेखर माने यांच्यासह कार्यकर्त्यांनी पत्रकार बैठकीत दिला.कोल्हापुरात सर्व अनुदान मिळाले, सांगलीत का नाही? असा सवाल त्यांनी केला.

ते म्हणाले, सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सांगलीत येत आहे. पुरग्रस्तांना सर्व ती मदत देण्याचा आदेशही झाले. मात्र, अमंलबजावणी अद्याप झालेली नाही.   शहरातील सुमारे 40000 कुटुंबांचा पंचनामा पूर्ण होऊन एक महिना झाला. रोख 5 हजार रुपये अनुदान मिळाले, पण उर्वरित दहा हजार रुपये अनुदान बँक खात्यावर जमा झाले नाही. 

ते म्हणाले, शहरातील 13 हजार व्यापार्‍यांचे नुकसान झाले आहे. त्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये मदत देण्याचा   निर्णय जाहीर झाला. पंचनामे होऊन 20 ते 25 दिवस झाले.  तरी अद्याप मदत मिळाली नाही. ज्यांची घरे पडली आहेत अशा 1200 घरांचा पंचनामा झाला. त्यांना नव्याने घरे बांधण्यासाठी त्यांना 95000 रु अनुदान तसेच 5 ब्रास वाळू व 5 ब्रास मुरूम मोफत देण्याचा निर्णय झाला आहे. शेतकर्‍यांच्या पिककर्ज माफ करण्याचा व कर्ज घेतले नाही त्यांना शासकीय मदतीप्रमाणे तीन पट नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला. परंतु अद्याप पूर्तता झाली नाही. त्यामुळे ही मदत तत्काळ द्यावी यासाठी सांगली कॉलेज कॉर्नर येथे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ. दखल घेतली नाही तर यात्रा रोखू, असे त्यांनी सांगितले. यावेळी  डॉ. सौ.गीता नागी, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप कांबळे, नितीन पाटील, ऋषिकेश पाटील, पांडुरंग व्हनमाने आदी उपस्थित होते.