Sun, Jul 12, 2020 18:35होमपेज › Sangli › मित्रानेच लूटमार केल्याचे उघड

मित्रानेच लूटमार केल्याचे उघड

Published On: Jun 07 2019 1:51AM | Last Updated: Jun 07 2019 1:51AM
मिरज : प्रतिनिधी

आरग (ता. मिरज) येथे विनायक सहदेव साळुंखे यांना लुटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांकडून 2 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. साळुंखे यांना दि. 2 जून रोजी त्यांच्याच एका मित्रासह पाचजणांनी आरग-शिंदेवाडी रस्त्यावर अडवले होते.  त्यांच्या हातातील व गळ्यातील असे साडेपाच तोळ्याने दागिने चोरुन घेवून पोबारा केला होता.या लूटमारीचा 48 तासात मिरज ग्रामीण पोलिसांनी तपास करुन आप्पू उर्फ दत्तात्रय महादेव नाईक, राजेश प्रकाश कोळी, प्रसाद ज्योतीराम बाबर, मनोज कुमार पवार अशा पाच जणांना अटक केली होती. वरील सर्व संशयितांनी लूटमारीची कबुली दिली आहे, अशी माहिती  पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी पत्रकार बैठकीत दिली.

दरम्यान  साळुंखे हे सुटीनिमित्त त्यांच्या मूळ गावी शिंदेवाडी येथे आले होते. सायंकाळी फिरण्यासाठी ते आरग येथे असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचा मित्र दत्तात्रय नाईक याने त्याच्या सांगलीवाडी येथील मित्रास दि. 1 जून रोजी फोन करुन “माझा एक विश्रामबाग मधील मित्र गावी आला आहे. त्याच्या अंगावर भरपूर सोने असून आपल्याला त्याला लुटायचे आहे”, असे सांगितले. पूर्ण कट रचला. 
दि. 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास साळुंखे हे आरग येथे फिरण्यासाठी आल्यानंतर दत्तात्रय नाईक याने साळुंखे यांना एका बारमध्ये नेऊन  दारू पाजली. नंतर  साथीदारांना फोन करुन आरग येथे बोलावून घेतले.

“ मला काम असल्याने मी सांगलीला जाणार आहे, तू घरी जा” असे म्हणून नाईक याने साळुंखे यांना बारबाहेर आणले.  बाहेर थांबवलेल्या मित्रांना हाच साळुंखे आहे अशी खूण केली. त्यानंतर तो तिथून निघून गेला.नंतर साळुंखे  आरग येथून शिंदेवाडी रस्त्याने जात असताना वरील चौघांनी त्यांना अडवून  सोन्याच्या अंगठ्या व गळ्यातील चेन असे एकूण साडेपाच तोळ्याचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. साळुंखे यांना  मारहाण करुन पोबारा केला होता. या प्रकरणाचा छडा लावून एक मोटारसायकल व साडेपाच तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती निरीक्षक कोळेकर यांनी दिली.