होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये खुनी हल्ल्यातील जखमीचा मृत्यू  

कुपवाडमध्ये खुनी हल्ल्यातील जखमीचा मृत्यू  

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:33PM

बुकमार्क करा
कुपवाड : वार्ताहर

शहरातील तुकाराम ईश्वरा गुजले (वय 26,रा. हनुमाननगर) या तरूणावर मंगळवारी रात्री चौघांनी खुनी हल्ला करून जखमी केले होते.त्याच्यावर मिरजेतील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा  गुरूवारी सायंकाळी मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून अन्य दोघेजण फरार झाले आहेत. चारही संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

अटक करण्यात आलेल्या मध्ये संशयित राहुल सुभाष माने(वय-23,रा.अवधूत कॉलनी, कुपवाड) व विकी ऊर्फ शामराव भाऊसाहेब हजारे(वय22,रा.अजिंक्यनगर, कुपवाड) यांचा समावेश आहे. तर या प्रकरणातील अन्य फरार असलेल्या दोघांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. संशयिताना न्यायालयाने सात दिवस पोलिस कोठडी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कुपवाड एमआयडीसीतील मुख्य रस्त्यावरील एका देशी दारू दुकानालगतच्या मोकळ्या जागेत जखमी  गुजले आणि संशयित राहुल माने व त्याचे अन्य तीन साथीदार यांच्यात किरकोळ कारणावरुन वादावादी झाली होती. यावेळी चौघा हल्लेखोरांनी तुकारामला लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली.  नाकातुन रक्तस्त्राव होऊन तो बेशुद्ध पडला होता. तुकारामचा भाऊ मुकेश व चुलते दादासाहेब गुजले यांनी त्याला तातडीने मिरज मिशन रुग्णालयात दाखल केले होते. 

दरम्यान या हल्ल्यात जखमी झालेल्या तुकारामच्या छातीच्या बरगड्या तुटल्या होत्या. डोक्यात रक्त साखळले होते.त्याच्यावर अतिदक्षता विभागात तीन दिवस उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच गुरूवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच नातेवाईकांनी रूग्णालयाबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे  खबरदारी म्हणून  रूग्णालयाबाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तपास पोलिस फौजदार बाबासाहेब माने करीत आहेत.