Sat, Jul 11, 2020 12:42होमपेज › Sangli ›  प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई

 प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 10:54PM

बुकमार्क करा
असं म्हणतात, प्रत्येकाची काळजी घेण्यासाठी स्वत:ला जाता येत नाही, म्हणून परमेश्‍वराने आईची देणगी दिली. संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला ‘जे प्रेम देई पुत्राशी, तेची दासा आणि दासी’, अशा संत तुकारामांच्या अभंगाप्रमाणे आपलेच मानून माया करणार्‍या आईसाहेब आता आपल्यात राहिल्या नाहीत. लहानपणी चरेगावात बहिणींबरोबर घरातील आंब्यांच्या खोलीत मनसोक्त आंबे खात दंगा करणार्‍या आईसाहेब. सासरी कासेगावला आल्यावर जमीन शेणाने व भिंती मातीने सारवून घर सजवणार्‍या आईसाहेब. एकत्र  कुटुंबात जात्यावर दळून 50 जणांचा स्वयंपाक करून मायेने वाढणार्‍या आईसाहेब. बापू मंत्री झाले, मोठे झाले तरीही गर्व न करता, साधेपणा न सोडता सर्व कुटुंबियांना व कर्मचार्‍यांनाही तसेच त्यांच्या मुलाबाळांनाही तेवढीच माया व आपुलकी देणार्‍या आईसाहेब. पाचही मुला- मुलींचे आणि नातवंडांचे पाय जमिनीवर ठेवून, त्यांना चांगले शिक्षण व संस्कार देणार्‍या आईसाहेब. स्वतः न चुकता दररोज योग व चालण्याचा व्यायाम करून दुसर्‍यांनाही स्फूर्ती देणार्‍या आईसाहेब. राडेसरांनी आणून दिलेल्या ओमाबा, एक होता कार्व्हर यासारखी पुस्तके आवर्जून वाचून चर्चा करणार्‍या आईसाहेब. हृदयरोग, कॅन्सर, अल्झायमर अशा त्रासदायक आजारांना धीराने व हसत हसत तोंड देणार्‍या आईसाहेब.  बघायला येणार्‍या आप्‍तांची चहापाणाची व जेवणाची काळजी करणार्‍या आईसाहेब. मरण समोर दिसत असताना सुध्दा सर्वांबरोबर हसत हसत फोटोसेशन करणार्‍या आईसाहेब. अशी त्यांची अनेक रुपे आज डोळ्यांसमोर येतात. आईसाहेबांसारख्या दैवी व्यक्तिमत्वाशी ज्यांचा संबंध आला त्यापैकीच मी सुध्दा एक भाग्यवंत.

प्रत्येकाच्या चुका माफ  करण्याचा लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या  स्वभाव बघून त्या वयात मलाही आश्‍चर्य वाटायचे. आजमितीस   मात्र राजकारणाचे, समाजकारणाचे वेगळे महत्व व परिणाम लक्षात येतात. आरोग्य शिबिरांच्या  निमित्ताने जतपासून शिराळापर्यंत फि रताना राजारामबापूंच्या आठवणीने आजही 35 वर्षांनंतर डोळे पुसणारी माणसं पाहिली, तर बापूंच्या कार्याची महती कळते. त्यांचे कार्य  किती महान होते ते लक्षात येते. 

एखाद्या लहान मुलाच्याही पाया पडणारा वारकरी, त्या मुलांत सुध्दा पांडुरंगच पाहतो. एक डॉक्टर म्हणून मला असे वाटते की,  स्वतः म्हणजे स्वजन्म आणि मुलं म्हणजे पुर्नजन्म असे म्हटले जाते. त्यामुळे  आज आपल्यात प्रत्यक्ष शरीराने नसल्या तरी आईसाहेब व बापूसुध्दा त्यांच्या मुलांच्या रूपाने आपल्यात आहेत, असे मी मानतो. तरीसुध्दा त्या परमेश्‍वराजवळ आईसाहेबांना आई मानणार्‍या या प्रत्येकांच्यावतीने मी मागतो....
घे जन्म तू फिरूनी, येईन मीही पोटी,
खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी 
 

डॉ. प्रकाश महाळुंगकर  - राजारामनगर, इस्लामपूर