होमपेज › Sangli › जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला

जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला

Published On: Apr 03 2019 1:51AM | Last Updated: Apr 02 2019 9:04PM
सांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत असल्याचे दिसत आहे. पारा 40  अंशांपर्यंत पोहोचला असून किमान तापमानही 24 अंशांपर्यंत वाढले आहे. उन्हाच्या तीव्रतेने शहरातील रस्ते दुपारी ओस पडल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे सांगलीकर हैराण झाले आहेत. या आठवड्यात तापमान 41 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. एप्रिलच्या प्रारंभीही या झळा कायम असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी कमाल तापमान 40 अंश होते तर किमान तापमान 24 अंशांवर होते. आर्द्रता 15 टक्के तर वारे 10 किलोमीटर प्रतितास वेगाने वहात होते. 

मार्चच्या अखेरच्या आठवड्यात तापमानात अचानकपणे वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय काही दिवस ढगाळ वातावरण होत असल्याने उकाड्यातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उन्हाच्या तीव्र झळांमुळे दुपारी नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातील रस्ते ओस पडले आहेत. ठिकठिकाणी थंड पेयांच्या गाड्यांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे प्रवाशांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून येत आहे.  

दरम्यान, या आठवड्यात कमाल तापमान 40 अंशांपर्यंत स्थिर राहण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात ते आणखी वाढण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे त्वचा विकारांमध्ये वाढ झाली आहे. शिवाय अन्य संसर्गजन्य आजारांमध्येही वाढ झाली आहे. सर्दी, पडसे, ताप, खोकल्याचे रूग्ण वाढल्याचे दिसून येत आहे.