Fri, Sep 20, 2019 21:59होमपेज › Sangli › तासगावात पत्नीकडून पतीचा गळा चिरून खून

तासगावात पत्नीकडून पतीचा गळा चिरून खून

Published On: Mar 22 2019 1:53AM | Last Updated: Mar 22 2019 1:53AM
तासगाव : शहर प्रतिनिधी

पतीचा आजार  आणि  सतत चारित्र्याचा संशय घेण्याचा प्रकार  यामुळे पत्नीने  पतीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. इंदिरानगर येथे बुधवारी मध्यरात्री हा प्रकार झाला. कल्‍लापा ऊर्फ कल्‍लू शिवाजी बागडी (वय 40, रा. इंदिरानगर) असे मृताचे नाव आहे.  याप्रकरणी त्याची पत्नी शांताबाई कल्‍लू बागडी (वय 35) हिला अटक करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेली

माहिती अशी ः कल्‍लू बागडी हा क्षयरोगाने गेली काही वर्षे आजारी होता. त्यामुळे सतत चिडचिड करीत असे. पत्नी शांताबाई हिच्या चारित्र्याबाबत सतत  संशय घेत होता. बुधवारी रात्री  त्यांच्यात वादावादी झाली. त्यावेळी ‘मीच मरतो’, असे सांगून घरातील चाकूसारखे धारदार शस्त्र घेऊन कल्‍लू घराबाहेर पडला. घराच्या मागच्या बाजूस असलेल्या खोलीत गेला. शांताबाईही त्याठिकाणी गेली.
कल्‍लूने चाकू गळ्याला लावून  आत्महत्या करण्याची धमकी दिली. शांताबाईने ‘तू कशाला मरतोस, मीच तुला मारते’, असे म्हणून चाकू धरण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत कल्‍लूच्या गळ्याला चाकू लागला. तो रक्‍ताच्या थारोळ्यात खाली पडला.  शांताबाईने पुन्हा एकदा त्याच्यावर वार केला. त्यामुळे कल्‍लूचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर सावध झालेल्या शांताबाईने आरडाओरड करुन नवरा सापडत नसल्याची आवई उठवली. काही वेळाने त्या खोलीत नवरा मरुन पडला असल्याचे दिसून आल्याचे नाटकही केले. रात्री एकच्या सुमारास शांताबाईने पोलिस ठाण्यात जाऊन पतीने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती दिली. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी दिला ताब्यात घेतले व तपास सुरू केला.

घटनास्थळावरील वातावरण व परिस्थिती पाहता पोलिसांना खुनाचा संशय येत होता. त्यादृष्टीने तपास  सुरू केल्यावर  गुरूवारी सकाळी शांताबाईने खून केल्याचे कबूल केले. या तपास प्रक्रियेत पोलिस उपअधिक्षक अशोक बनकर, पोलिस  निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले, हवालदार पवार, पोलिस नाईक दरिबा बंडगर,  सोमनाथ गुंडे, विनोद सकटे, सचिन घाटगे, मोहन वंडे, शरद निकम, जोतीराम पवार, विलास मोहिते, प्रज्ञा जाधव यांनी भाग घेतला.

अवघ्या बारा तासांत खुनाचा उलगडा

रात्री बाराच्या सुमारास खुनाचा प्रकार झाल्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासात  शांताबाईवर संशय घेऊन त्याद‍ृष्टीने तपास सुरू केला. अवघ्या बारा तासात शांताबाई हिने खुनाची कबुली दिली. तासगाव पोलिसांनी केलेल्या या तपासाचे पोलिस उपअधीक्षक बनकर यांनी कौतुक केले.