Sun, Oct 20, 2019 02:00होमपेज › Sangli › तासगाव पूर्व भागात मुसळधार पाऊस, 'अग्रणी'ला पुन्हा पूर (video)

तासगाव पूर्व भागात मुसळधार पाऊस, 'अग्रणी'ला पुन्हा पूर (video)

Last Updated: Oct 10 2019 8:17AM
तासगाव : प्रतिनिधी

तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात दोन दिवस मुसळधार पाऊस झाला. सिध्देवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच अग्रणी नदीचे पात्र दुथडी भरून पुन्हा वाहू लागले आहे. त्यामुळे नदीला पुन्हा पूर आल्याचे चित्र आहे. तासगाव तालुक्यातील सावळज वज्रचौंडे, गव्हाण व कवठेमहांकाळ तालुक्यातील मळणगाव हद्दीत अग्रणी तुडूंब भरुन वाहू लागली आहे. काही ठिकाणी पाणी नदीच्या पात्राबाहेर गेले आहे.

गेल्या दोन दिवसांत तासगाव तालुक्याच्या पुर्वेकडील वायफळे, बिरणवाडी, सिध्देवाडी, दहिवडी, सावळज, अंजनी, गव्हाण, वडगाव, नागेवाडी गावांना पावसाने झोडपून काढले आहे.

तालुक्यात यंदा सप्टेंबर अखेर सरासरीच्या १२७ टक्के पाऊस झाला आहे. परंतु, पुर्वेकडील सिध्देवाडी आणि अंजनी तलाव मात्र अद्यापही कोरडेच होते. दोन्ही तलावांमध्ये पाण्याचा फक्त मृतसाठा शिल्लक होता. शुक्रवारपासून रविवार पर्यंत पुर्वभागात इतका मोठा पाऊस पडला की, ४८ तासात सिध्देवाडी तलाव भरला. 

सिध्देवाडी तलाव पूर्ण भरल्याने बुधवारी दुपारी पाणी बाहेर पडून अग्रणी नदीच्या पात्रात दाखल झाले. बुधवारी रात्री अग्रणी पात्रातील वायफळे-यमगरवाडी, सावळज-बिरणवाडी, गव्हाण-मणेराजुरी आणि मळणगाव-योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले होते. तसेच अग्रणी पात्रातील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे भरले आहेत.

वायफळे येथील अग्रणी नदीपात्रातील बंधारा पुर्ण क्षमतेने भरला आहे. मळणगाव - योगेवाडी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला आहे.

नदी पात्रालगतच्या मंदिरात पाणी

तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये अग्रणी पात्रालगत यल्लमा देवीची मंदिरे आहेत. नदीला आलेल्या पुरामुळे सावळज, मळणगाव, हिंगणगाव गावांच्या हद्दीतील मंदिरात पाणी शिरले आहे.