होमपेज › Sangli › वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर मैदानात

वंचित बहुजन आघाडीतर्फे गोपीचंद पडळकर मैदानात

Published On: Apr 03 2019 1:51AM | Last Updated: Apr 02 2019 10:49PM
सांगली : प्रतिनिधी

युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी मंगळवारी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. आघाडीतर्फे संस्थापक सदस्य जयसिंग शेंडगे यांनी पडळकर यांची सांगली लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी घोषित केली. बुधवारी सकाळी 11 वाजता पडळकर  उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप, आरएसएस, संभाजी भिडे हा माझा भूतकाळ असून यापुढे वंचित बहुजन आघाडीसोबतच राहणार आहे, असे पडळकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 
माजी आमदार प्रकाश शेंडगे, जयसिंग शेंडगे, नामदेव करगणे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, ब्रह्मदेव पडळकर, प्रशांत शेजाळ, डॉ. विवेक गुरव, अमोल पांढरे, सचिन माळी, शकिल पिरजादे, शाकीर तांबोळी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पडळकर यांनी प्रवेश केला. 

तो फोटो काँग्रेसने व्हायरल केला

पडळकर म्हणाले, मी भाजपमध्ये होतो. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासोबतचा माझा फोटो खरा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिवशक्ती संगम कार्यक्रमास मी हाफपँट घालून एक हजार कार्यकर्त्यांसह उपस्थित होतो. पण मी  दि. 15 जुलै 2018 रोजी भाजप सोडला आहे.  संघ, शिवप्रतिष्ठान, संभाजी भिडे यांचाही संबंध त्याचवेळी सुटला आहे.  मात्र मला वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळू नये यासाठी काँग्रेसने माझे  भिडे यांच्यासोबतचे तसेच हाफचड्डीतील  फोटो व्हायरल केले. पण हे फोटो व्हायरल करणार्‍यांचीच आता पंचाईत होणार आहे. 

संजय पाटील यांच्यासोबत आता केवळ दीपक शिंदेच

पडळकर म्हणाले, खासदार संजय पाटील यांच्याविषयी भाजपमध्येच मोठी नाराजी आहे. प्रचारात त्यांच्यासोबत केवळ दीपक शिंदे हेच दिसत आहेत. भाजपचे चार आमदार, जिल्हाध्यक्ष त्यांच्यासोबत कुठेच दिसत नाहीत. मी भाजपमध्ये काम केले आहे. बूथवरचा भाजपचा कार्यकर्ता माझ्यासोबतच आहे.  संजय पाटील यांची जिल्ह्यातील दादागिरी मोडून काढणार आहे. जिल्हा भयमुक्त करणार आहे. 

निळा, पिवळा, हिरवा रंग एकत्र

पडळकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांंना नागपूर येथे भेटलो आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निळा, पिवळा आणि हिरवा रंग एकत्र आला आहे. लोकसभा निवडणुकीत ही आघाडी मोठे यश मिळवेल. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचीच सत्ता येईल. ते म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये आता वंचित, बहुजनांना न्याय मिळू शकणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी हे प्रस्थापितांचेच पक्ष आहेत. मराठा समाजातील तरुणांचा या प्रस्थापितांनी केवळ वापर करून घेतला. जिल्हा परिषदेच्या पुढे त्यांना जाऊ दिले नाही. आमदार, खासदारकी प्रस्थापितांच्या घरातच राहिली आहे. पण वंचित बहुजन आघाडीमुळे आता बहुजनांमधील तरूण आमदार, खासदार होतील. 

मतविभागणी टाळण्यासाठी माघार : शेंडगे

प्रकाश शेंडगे म्हणाले, शेंडगे व पडळकर यांच्या उमेदवारीमुळे होणारी मतविभागणी टाळण्यासाठी मी माघार घेत आहे. जयसिंग शेंडगे म्हणाले,  अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरच्या सभेत माझी उमेदवारी जाहीर केली होती. पण पडळकर यांच्या रुपाने चांगला उमेदवार मिळाल्याने मी माघार घेत आहे.