Tue, Jul 14, 2020 06:44होमपेज › Sangli › सांगली, इस्लामपुरात गुंडांची दहशत!

सांगली, इस्लामपुरात गुंडांची दहशत!

Published On: Jan 23 2019 1:06AM | Last Updated: Jan 22 2019 10:43PM
संजयनगर, हनुमाननगर, वाल्मीकी आवासमध्ये वाढता वावर 

सांगली : प्रतिनिधी

शहरातील  वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसर, संजयनगर, हनुमाननगर येथे गुंडांची दहशत वाढली आहे.  वाल्मिकी आवास परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगार पवन साळुंखेसह त्याच्या साथीदारांनी सोमवारी चांगलीत दहशत माजवली. गुंडांच्या दहशतीने घबराट निर्माण झाली आहे. 

साळुंखे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याने शासकीय रुग्णालयात पोलिसांनी मारहाण केल्याचा खोटा आरोप केला होता. मात्र सातत्याने गुन्हे करणारा हा गुन्हेगार निर्ढावलेला आहे. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारवाया कमी होण्याऐवजी वाढल्याचाच आजपर्यंतचा इतिहास आहे. त्याच्याविरोधात हद्दपारीचा प्रस्तावही पाठवण्यात आला होता. पवन साळुंखेसह त्याच्या साथीदारांच्या गुन्हेगारी कारवाया वाढल्याने आता पोलिसांनी त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची गरज आहे. त्याच्यासह त्याच्या टोळीवर आतापर्यंत म्हणावी तशी कडक कारवाई पोलिसांनी केली नसल्यानेच त्याचे धाडस वाढल्याचीही चर्चा आहे. सोमवारी गांजाच्या नशेत त्याने वाल्मिकी आवास योजना परिसरात धुडगूस घातला. गुन्हेगारांचे निवास असणारे वाल्मिकी आवास त्याच्या दहशतीने हादरून गेले आहे. पोलिसांनी आतापर्यंत अनेकदा ऑल आऊट ऑपरेशन राबवले आहे. पण गेल्या कित्येक दिवसांत वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसरात कोम्बिंग ऑपरेशन केलेले नाही. केवळ साळुंखेच नव्हे तर रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार रात्री नशेबाजी करून याच परिसरात आश्रय घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही पोलिसांकडून येथे कोम्बिंग ऑपरेशन करण्यास टाळाटाळ का केली जाते, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

पोलिस अधीक्षकांनी लक्ष घालण्याची गरज

जुना बुधगाव रस्ता आणि वाल्मिकी आवास घरकुल योजना परिसरातील गुन्हेगारी, दहशत मोडून काढण्यासाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी लक्ष देण्याची मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे. शस्त्रांच्या धाकाच्या जोरावर रेकॉर्डवरील गुन्हेगार या परिसरात आश्रय घेतात. शिवाय अनेक बंद घरे त्यांचे नशेबाजीचे अड्डे बनले आहेत. अनेक गुन्ह्यांचे कटही याच परिसरात रचले जातात. त्यामुळे या परिसरात तातडीने कोम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे. 

इस्लामपुरात धुडगूस घालणार्‍यांना चाप लावण्याचा प्रयत्न

इस्लामपूर : संदीप माने

इस्लामपूर शहरात सुरू असलेल्या पोलिसांच्या धडक कारवाईने फाळकूट दादांचे धाबे दणाणले आहेत. शहरात दहशत माजविणार्‍या गुंडांची चोप देत धिंड काढून पोलिसी खाक्या काय असतो हे दाखवून दिले आहे. गुंड प्रवृत्तीला ठेचल्याने पोलिसांचे नागरिकांच्यातून कौतुक होत आहे.

शहर झपाट्याने विकसित होत असताना दुसर्‍या बाजूला शहरात गुन्हेगारी वाढत आहे. शहरात फाळकूटदादांनी उच्छाद घातला आहे. व्यापार्‍यांना धमकावणे, त्यांच्याकडून   खंडणी उकळणे,  दुकानात शिरून तेथील साहित्य फुकटात घेऊन जाणे, असे प्रकार वारंवार घडत होते. मोकळ्या जागेवर जबरददस्तीने कंपाऊंड मारून ती जागा  बळकावण्याचा प्रकारही काही गुंडांकडून घडत आहेत. काही सावकार पठाणी व्याजाने पैसे देऊन त्याची वसुली फाळकूटदादांकडून करून घेत होते. शिवनगर परिसरात महिलेचे घर बळकावल्याचा प्रकार समोर आला होता. नागरिक, व्यापारी, व्यावसायिक दहशतीखाली होते.
गेल्या आठवड्यात अनमोल मदनेच्या टोळीने शहरात धुडगूस घातला. धूमस्टाईलने मोटारसायकली फिरवत नंग्या तलवारी नाचवल्या. दारूच्या दुकानात धिंगाणा करून दुकान पेटवण्याची धमकी दिली.सराफी दुकानात शिरून सोन्याचा ऐवज कमी किंमतीत घेतला. पैसे मागितले म्हणून दुसर्‍या दिवशी एका कापड दुकानात शिरून टोळीने खुनी हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर शहरातील नागरिक दडपणाखाली होते. पोलिस निरीक्षक विश्‍वास साळोखे यांनी धडक कारवाई करीत टोळीच्या मुसक्या आवळल्या. गुंडांची शहरातून धिंड काढली. या प्रकारानंतर लगेच सोन्या शिंदेच्या टोळीने खंडणीसाठी व्यावसायिकावर खुनीहल्ला केला. यामुळे पुन्हा फाळकूटदादांचे कारनामे चव्हाट्यावर आले. या टोळीला जेरबंद करून त्यांची धिंड काढली. मंत्री कॉलनीतील अड्ड्यावर जुगार खेळला जात होता. तो उद्ध्वस्त केला.

नशिल्या गोळ्या...डबल नशा...

दारू व नशिल्या गोळ्यांचे सेवन गुंडाकडून होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एक प्रकारची झिंग चढते.  या नशेचा मेंदूवर अंमल होऊन फाळकूट दादांच्या दादागिरीला अधिकच उत येतो.  कुणी नशिल्या गोळ्या विकल्याचे समोर आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करू,असा इशारा पोलिसांनी दिला आहे.