Tue, Dec 10, 2019 08:30होमपेज › Sangli › तुपारीच्या शेतकर्‍याला पंधरा लाखांचा गंडा

तुपारीच्या शेतकर्‍याला पंधरा लाखांचा गंडा

Published On: Jun 29 2019 1:14AM | Last Updated: Jun 29 2019 12:26AM
सांगली : प्रतिनिधी

व्यवसायासाठी 50 कोटी कर्ज देण्याचे आमिष दाखवून तुपारी (ता. पलूस) येथील दिनकर शिवाजी पाटील (वय 54) या शेतकर्‍याला 15 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी पुण्यातील तीन ठकसेनांविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन पाटील, विशाल कापरे व अभिजित काटे (सर्व रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. दिनकर पाटील यांची 2017 मध्ये संशयितांशी पुण्यात ओळख झाली होती. यातून संशयितांनी पाटील यांना ‘आम्ही पंजाब नॅशनल बँकेत कर्ज मंजूर करून देण्यासाठी एजंट म्हणून काम पाहतो’, असे सांगितले. 

पाटील यांनी ‘पलूसमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी मला 50 कोटी रुपयांचे कर्ज पाहिजे आहे. ते मिळेल का’, असे विचारले. यावर संशयितांनी ‘तुम्हाला ते मिळवून देतो; पण त्यासाठी 15 लाख रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागेल’, असे सांगितले. पाटील यांनीही शुल्क भरण्याची तयारी दर्शविली. त्यांच्या  खात्यावरून त्यांनी 15 लाख रुपये संशयित हर्षवर्धन पाटील व विशाल कापटे यांच्या खात्यावर वर्ग केले. या दोघांनी ही रक्‍कम तिसरा संशयित काटे याच्या  बँकेतील खात्यावर ऑनलाईन वर्ग केली. 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. 

रक्‍कम दिल्यानंतर महिना होऊन गेला तरी संशयितांनी कर्जाची प्रक्रिया राबविली नाही. पाटील यांनी त्यांच्याकडे चौकशी केली; पण तेव्हापासून ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पैसे दिल्यानंतर दोन वर्षे कर्जासाठी पुणे वारी

पाटील यांनी पैसे दिल्यानंतर कर्ज कधी मिळणार, यासाठी संशयितांकडे तब्बल दोन वर्षे पुणे वारी केली. जी काही कागदपत्रे लागतील, ती सर्व त्यांनी दिली होती. मात्र, संशयितांनी त्यांना नेहमीच भूलथापा मारून वेळ मारून नेली होती.