Mon, Jul 13, 2020 06:36होमपेज › Sangli › ‘अन्न, औषध’चे बर्फ कारखान्यांवर छापे

‘अन्न, औषध’चे बर्फ कारखान्यांवर छापे

Published On: May 06 2019 1:50AM | Last Updated: May 05 2019 8:54PM
सांगली :शशिकांत शिंदे

विना परवाना आणि दूषित बर्फ निर्मिती थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम उघडली आहे. जिल्ह्यात अवैध बर्फ कारखान्यांवर  ठिकठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. दरम्यान, संशयावरून दोन कारखान्यातील बर्फाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. ‘अन्न व औषध’ विभागाच्या या धडक  कारवाईमुळे बहुसंख्य बर्फ उत्पादकांनी आता रीतसर परवाने घेण्यास सुरूवात केली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढल्याने उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यातून दिलासा मिळण्यासाठी  थंड पेयांचा वापर वाढला आहे.  मात्र शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी उसाचा रस, बर्फगोळ्याकरिता वापरला जाणारा बर्फ हा अयोग्य पद्धतीने बनवलेला वापरला जातो.  मासे, भाजी, दूध आदी नाशवंत वस्तू साठवण्यासाठीचा बर्फ देखील थंडपेयात मिसळला जातो.  

दुष्काळामुळे आधीच भीषण पाणी टंचाई आहे. यामुळे विहिरी, कूपनलिका अशा मिळेल त्या मार्गाने मिळणारे पाणी मिळवून कारखान्यांमध्ये बर्फ तयार केला जातो आहे. हा बर्फ आरोग्यासाठी घातक ठरत   आहे. याबाबतचे वृत्त ‘पुढारी’मध्ये प्रसिद्ध झाले होते. यानंतर ‘अन्न व औषध’ प्रशासन विभागाने रसवंतीगृह, ज्यूस सेंटर, बर्फ कारखाने  आदि ठिकाणी छापे टाकले. तसेच विना परवाना बर्फ कारखान्यांनी तातडीने परवाने घ्यावेत, अन्यथा फौजदारी करण्यात येईल, असा इशारा दिला. 

याचवेळी रसवंतीगृह, ज्यूस सेंटर अशा ठिकाणीही परवानाधारक कारखान्यातून बर्फ घेण्याबाबत आदेश दिले. त्याची दखल घेऊन काही कारखान्यांनी परवाने घेतले आहेत. तर बावची येथील एका कारखान्याने परवान्यासाठी अर्ज केला असल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले.

दूषित बर्फ आढळल्यास गुन्हा : चौगुले

दूषित बर्फ बाजारात येऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे  सतर्कता बाळगण्यात येत आहे. काही ठिकाणी छापे टाकून दोन ठिकाणचे नमुने ताब्यात घेतले आहेत. त्यात सांगलीतील एक्स्मो  आणि जत येथील हिमालय आईस फॅक्टरी यांचा समावेश आहे.  जिल्ह्यातील कोल्ड्रींक्स् व्यवसायिक, रसवंतीगृह चालक या ठिकाणी बर्फ कोणत्या ठिकाणाहून घेतला आहे, याची चौकशी सुरू आहे. त्यांनी परवानाधारक कारखान्यातूनच बर्फ खरेदी करावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकुमार चौगुले यांनी ‘पुढारी’शी बोलताना दिला.