होमपेज › Sangli › विट्यात पाचशेच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याने खळबळ (video)

विट्यात पाचशेच्या नोटांचे तुकडे पडू लागल्याने खळबळ (video)

Published On: May 15 2019 4:24PM | Last Updated: May 15 2019 4:24PM




विटा : विजय लाळे

वाळलेले झाडाचे पान ज्याप्रमाणे हाताने चुरगळता, मोडता येते, त्याप्रमाणे पाचशेच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार विट्यात घडला आहे. याबाबत विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक दळवी यांना सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी प्रात्यक्षिक दाखविले आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली असून राठोड यांनी जवळपास ५०० रुपयांच्या १४ नोटांच्या बाबत (म्हणजे तब्बल सात हजार रुपये) हा प्रकार घडला असून याबाबतची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.

नेमके काय घडले?

अनिल राठोड यांच्या शेजारी एक वृद्ध महिला राहते ती रोजंदारीवर मोलमजुरी करते तिला दीड महिन्यापूर्वी सात हजार रुपये मिळाले होते. ते तिने पाकिटात घालून कपाटात ठेवले होते. काल त्यातील साडेतीन हजार रुपये बाहेर काढून रुमालात बांधून मिरच्या आणण्यासाठी बाजारात ती गेली. त्यानंतर रुमाल उघडून पैसे द्यायचे म्हणून पाचशेची एक नोट काढताच 500ची एक नोट घडी पडून तुकडा पडल्याचे आढळले. त्यानंतर  तिने दुसरी नोट काढली असता ती नोट सुद्धा घडी पडताच तुटली असल्याचे आढळले. घाबरुन त्या महिलेने सर्व नोटा घडी करून पाहिले असता त्या नोटांचे तशाच प्रकारे तुकडे पडत असल्याचे दिसले. 

याघटनेनंतर त्या महिलेने शेजारी राहत असलेल्या राठोड यांच्याकडे जाऊन घडला प्रकार सांगितला असता त्यांनाही तशाच प्रकारे नोटांचे घड्या घालत तुकडे पडत असल्याचे आढळून आले. त्यावर दुसरी राठोड यांनी तात्काळ विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या संपर्क साधला.

शाखाव्यवस्थापक दळवी यांनी संबंधित नोटा या केमिकलच्या अथवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त केला मात्र आमच्या शाखेत आलेल्या करोडो रुपयांच्या अशा प्रकारच्या नोटा या वर्षानुवर्षे कपाट बंद असतात त्यांना काहीही होत नाही असे उत्तर दिले.  परंतु राठोड यांचे त्यावरच समाधान झाले नाही त्यांनी ही गोष्ट आपण रिझर्व बँक ऑफ इंडिया च्या निदर्शनास आणावी असा आग्रह केला त्यानंतर सध्या राठोड यांना पाचशे रुपयांची एक नोट जी बऱ्यापैकी एका बाजूने तुटली होती ती बदलून देण्यात आली आहे परंतु उरलेले तीन हजार रुपयांचे तुकडे आम्ही बदलून देऊ शकत नाही उत्तर दिले आहे.

विशेष म्हणजे नोटाबंदीनंतर चलनात आलेल्या नवीन नोटा या पूर्वीच्या नोटांच्या तुलनेत हलक्या दर्जाच्या आहेत असे शाखा व्यवस्थापक यांनी सुद्धा मान्य केले आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ माजली असून अनेकांनी आपापल्या पाचशेच्या नोटा बदलून अथवा मोडून सुट्टे करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत याबाबत बँक ऑफ इंडिया अथवा  संबंधित यंत्रणेने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.