Mon, Jul 13, 2020 07:31होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र

इस्लामपूरमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र

Published On: Oct 03 2019 2:13AM | Last Updated: Oct 02 2019 10:52PM
इस्लामपूर : अशोक शिंदे

आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांची एकी करण्याचा ‘बार’ अखेर फुसका ठरला. आता शिवसेनेकडून गौरव नायकवडी उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. तसेच बी.जी. पाटील, शाकीर तांबोळी अशा अनेकांची नावे  पुढे आली आहेत. त्यामुळे ‘बहुरंगी’ लढतीचे संकेत मिळत आहेत. 

गुरुवारी (दि.  3) नगराध्यक्ष निशिकांत पाटील हेदेखील अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात सलग सहा निवडणुकांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे एकहाती वर्चस्व आहे.  मंगळवारी ते अर्ज दाखल करणार आहेत. त्यांची ही सलग सातवी निवडणूक आहे. 

नगराध्यक्ष पाटील यांना आव्हान...

गेल्या महिन्याभरापासून या मतदारसंघात भाजप - सेनेमधून उमेदवारीसाठी कमालीची रस्सीखेच दिसली. नगराध्यक्ष पाटील यांनी तर गेल्या दीड-दोन वर्षांपासून ‘भावी आमदार’ अशी इमेज तयार करण्याचा जोरदार प्रयत्न केला होता. मात्र कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व त्यांच्या सहकार्‍यांनी पाटील यांना वगळून ‘आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या’ असा आक्रमक सूर आळवला.  पाटील यांना खोत यांच्यासह राहुल महाडिक, सम्राट महाडिक, विक्रम पाटील, गौरव नायकवडी, वैभव शिंदे, आनंदराव पवार, भीमराव माने आदिंनी घेतलेल्या भूमिकेचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर आता हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे दिसत आहे. युवा नेते गौरव नायकवडी  शिवसेनेकडून मैदानात उतरत आहेत. 

बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, वंचित आघाडीचे शाकीर तांबोळी तसेच अ‍ॅड. जमीर खानजादे, मन्सूर मोमीन आदींची नावे चर्चेत आहेत. इकडे काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांची भूमिका अद्याप अस्पष्ट आहे.  एकूणच  राष्ट्रवादीच्याविरोधात प्रत्येकाचा ‘सवता सुभा’ दिसतो आहे.

मुख्यमंत्र्यांचा आदेश मानून महायुतीच्या पाठीशी : खोत 

सदाभाऊ खोत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत या परिसराचा प्रचारप्रमुख मी होतो. तेंव्हापासून आमची रयत क्रांती संघटना येथील उमेदवारीसाठी आग्रही राहिली आहे. आता आम्ही महायुतीसोबत घटक पक्ष असल्याने या मतदारसंघात महायुतीचा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश मानून सक्रिय राहू.