इस्लामपूर : शहर वार्ताहर
येथील प्रकाश हॉस्पिटलसमोर मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. त्यामध्ये दोन्ही गटांतील सहा कार्यकर्ते जखमी झाले. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन हुल्लडबाजांना हुसकावून लावल्याने मोठा अनर्थ टळला. निवडणुकीच्या तोंडावर दोन्हीही गटांत तीव्र संघर्ष उफाळण्याची चिन्हे दिसत आहेत.
मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रचार प्रारंभाची सभा झाली. सभेनंतर आष्ट्याकडे जाणार्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी प्रकाश हॉस्पिटलसमोर थांबून घोषणाबाजी करायला सुरुवात केली. त्यावेळी तेथे असणार्या काही कर्मचार्यांशी त्यांचा वाद सुरू झाला. त्यानंतर दोन्ही गटांत धुमश्चक्री उडाली.
त्याचवेळी हॉस्पिटलमध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या समर्थकांची बैठक पार पडली होती. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. या मारामारीची माहिती मिळताच पाटील समर्थकांनी घटनास्थळी धाव घेतली. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि निशिकांत पाटील यांच्या समर्थकांची जोरदार हाणामारी झाली. यामध्ये काठ्यांचाही वापर करण्यात आला. या मारामारीत दोन्ही गटांतील सहा कार्यकर्ते जखमी झाले.
हाणामारीची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे पोलिस कर्मचार्यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “आम्हाला मारहाण करणार्याला आमच्या ताब्यात द्या”, असा पवित्रा घेऊन रस्त्यावर ठिय्या मारला. त्यामुळे तासभर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हटकले.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीच हॉस्पीटलसमोर घोषणाबाजी केली, कर्मचार्यांबरोबर वाद केला, त्यामुळे तणाव तयार झाल्याचे नगराध्यक्ष पाटील गटाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
दरम्यान, प्रकाश हॉस्पिटलसमोरही नगराध्यक्ष पाटील यांचे कार्यकर्ते जमू लागले होते. त्यामुळे कमालीचे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हॉस्पिटलकडे जाणार्या रस्त्यावर नाका-बंदी केली. कोणालाही ते आत जाऊ देत नव्हते.
रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. दोन्ही गटाकडील पदाधिकार्यांनी पोलिस उपअधीक्षकांची भेट घेतली. दोन्ही गटांकडून तक्रारी देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.