Wed, Jul 15, 2020 16:20होमपेज › Sangli › आरेवाडीत तरुणीचा खून बापाकडूनच

आरेवाडीत तरुणीचा खून बापाकडूनच

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 17 2018 7:11AMनागज : वार्ताहर

वारंवार सांगूनही लग्‍नानंतरही प्रियकराशी अनैतिक संबंध ठेवत असल्याच्या कारणावरून प्रियांका काशिनाथ हाके (वय 20, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) हिचा आरेवाडीत  तिच्या वडिलांनीच खून केल्याचे निष्पन्‍न झाले आहे. हणमंत ज्ञानोबा खांडेकर (वय 40, रा. खोतवाडी, इचलकरंजी) असे त्याचे नाव असून त्याला कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रियांका हिचे वडील हमालीचे काम करतात. प्रियांकाचा विवाह अकरा  महिन्यांपूर्वी तिचा मामा काशिनाथ यमनाप्पा हाके (वय 24, रा. तळंदगे, ता. हातकणंगले) याच्याशी झाला होता. खोतवाडी येथील अंबादास कुंभार याच्याशी प्रियांकाचे लग्‍नाआधीपासून अनैतिक संबंध होते. लग्‍नानंतरही  ते सुरू होते. महिनाभरापूर्वी पुन्हा ती  त्याच्याबरोबर पळून गेली होती. ती परत आल्यावर पती तिला नेण्यास तयार नव्हता. 

वडिलांनी तिला आठ दिवस तिच्या  सांगलीतील चुलत्यांच्या घरी ठेवले होते.  ‘प्रियकराशी असलेले अनैतिक संबंध सोड’, असे वडील, आई व पतीने वारंवार सांगितले होते. पण तिच्या वर्तनात बदल होत नव्हता. त्यामुळे आपल्या     मुलीला कायमचेच संपवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला होता. रविवारी वडील ( खांडेकर)  प्रियांकाला  प्रतापपूर, धावडवाडी ( ता. जत) येथे सोडतो असे सांगून मोटारसायकल ( एम.एच.09 1242) ने घेऊन गेले.शिरढोण येथे नाष्टा करून दोघेही आरेवाडीच्या बिरोबा बनात गेले. 

रात्री तिथे  पत्र्याच्या शेडमध्ये प्रियांका आणि तिचे वडील हणमंत खांडेकर यांच्यात वादावादी झाली. ‘तू सांगूनही प्रियकराशी असलेले संबंध तोडत नाहीस. माझी इज्जत घालवलीस’ असे म्हणून खांडेकर याने तिच्या डोक्यात दगड घातला. ‘पप्पा मला मारू नका’अशी प्रियांकाने  किंकाळी फोडली. जवळपास असलेल्यांना ‘काय झाले ?’ म्हणून विचारले. पण ‘काही नाही’ असे खांडेकर याने सांगितले.त्यानंतर प्रियांकाचा मृतदेह  तेथेच टाकून त्याने मोटारसायकलवरून पलायन केले.

मोटारसायकलमुळे  खुनाचा छडा

संशयित खांडेकर याच्या  मोटारसायकलचा क्रमांक आरेवाडी येथील एकाने पाहिला होता.त्या क्रमांकावरून कवठेमहांकाळचे पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने पोलिसांनी तपास केला. प्रियांकाचा पती काशीनाथ हाके आणि  आई लक्ष्मी हणमंत खांडेकर  या दोघांनी संशियताचे नाव  लपवले होते. बुधवारी प्रियांकाचा मृतदेह ताब्यात घेतला होता. मात्र पोलिसांनी खुनाचा छडा लावला होता.