होमपेज › Sangli › कर्जमाफीच्या बोगस मेसेजने शेतकरी संतप्त 

कर्जमाफीच्या बोगस मेसेजने शेतकरी संतप्त 

Published On: Apr 16 2018 7:27PM | Last Updated: Apr 16 2018 7:27PMविटा : विजय लाळे 

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफीसंदर्भात घोर फसवणूक चालवली आहे. आता तर संबंधित कर्जदाराच्या मोबाईलवर चक्क कर्जाची रक्कम जमा झाल्याचे खोटे मेसेज येऊ लागले आहेत. याप्रकारमुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर होत आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी शिवसेनेसह मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने होत आहे. त्यानंतर सरकारने तत्वतः कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. मात्र त्यात ही ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरणे, सतरा प्रकारचे कागद जोडणे यामुळे शेतकरी अगदी जिकिरिला आला. त्यानंतर कसेबसे करून अनेकांनी हे  कर्जमाफीचे अर्ज भरले. कर्जमाफी तर प्रत्यक्षात मिळालीच नाही पण काय नशिबी आलेय ते बघा .....

सांगली जिल्ह्यातील मिटकी (ता. आटपाडी) येथील जालिंदर कटरे या शेतकऱ्याने बँक ऑफ इंडियामधून दोन वर्षांपुर्वी 50 हजार रुपयांचे कर्ज काढले होते. त्यांनी कर्जमाफीसाठी अर्जही केला होता. त्यांना 1 एप्रिल रोजी एक मेसेज आला. त्यात छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत आपल्या कर्ज खात्यावर कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे असे म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात कटरे यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट झाले. कर्जमाफीचा हा मेसेज शासनाच्या MAHGOV या संकेतस्थळावरून आला होता.

कर्जमाफी अजून व्यवस्थित झाली नसताना या प्रकारचे खोटे मेसेज पाठवून सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का? असा सवाल शेतकऱ्यांच्याकडून विचारला जात आहे.

Tags : farmer, received, loan waiver, fake message, sangali news, mahgov