होमपेज › Sangli › कडेगाव-पलूस : परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्येच सामना

कडेगाव-पलूस : परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमध्येच सामना

Published On: Sep 19 2019 1:31AM | Last Updated: Sep 18 2019 8:16PM
रजाअली पीरजादे

कडेगाव-पलूस मतदारसंघात या खेपेसही कदम-देशमुख गटांमध्ये पारंपरिक लढत होणार आहे. यावेळी ही पारंपरिक लढाई दिग्गज नेत्यांच्या वारसदारांत होणार आहे.

काँग्रेसतर्फे दिग्गज नेते (स्व.) डॉ. पतंगराव कदम यांचे पुत्र विद्यमान आमदार डॉ. विश्‍वजित कदम आणि भाजपतर्फे माजी आमदार (स्व.) संपतराव देशमुख यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी निश्‍चित आहे. दोघेही निवडणुकीच्या द‍ृष्टीने तयारीला लागले आहेत.स्वातंत्र्यसेनानी जी. डी. बापू लाड यांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हेही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे.

मतदारसंघात 1980 पासून कदम-देशमुख गटातील राजकीय पारंपरिक संघर्ष आजखेर टिकून आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र डॉ. विश्‍वजित कदम या मतदारसंघात बिनविरोध निवडून आले आहेत. ज्येष्ठ नेते मोहनराव कदम व पृथ्वीराज देशमुख विधान परिषदेचे सदस्य आहेत. या मतदारसंघात तीन आमदार आहेत. संग्रामसिंह देशमुख हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. पृथ्वीराज देशमुख भाजपचे, तर मोहनराव कदम हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. हा मतदारसंघ डॉ. पतंगराव कदम यांचा पर्यायाने काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघाचे डॉ. कदम यांनी 30 वर्षे नेतृत्व केले. त्यांनी आपले  वर्चस्व कायम राखले.

आज जिल्ह्यात भाजपचा एक खासदार आणि चार आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यावर भाजपची पकड आहे. परंतु, कडेगाव-पलूस मतदारसंघावर काँग्रेसची  पकड आहे. त्यामुळे हा मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे काँग्रेस आपला बालेकिल्ला शाबूत ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी या मतदारसंघाचा आघाडी सरकारच्या काळात मोठा विकास केला आहे. त्यांच्या निधनानंतर आमदार मोहनराव कदम व आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी या मतदारसंघात विकासकामे राबवली आहेत. विश्‍वजित कदम यांनी मतदारसंघात आढावा बैठकांचा धडाका लावला आणि  मतदारसंघातील जनतेचे प्रश्‍न थेट विधानसभेत मांडून विकासकामांना चालना दिली आहे. त्यांचा लोकसंपर्कही मोठा आहे. तसेच कार्यकर्त्यांचे नेटवर्कही भक्‍कम आहे. संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजना मतदारसंघात राबवल्या आहेत. आरोग्य महाशिबिर, दिव्यांग अभियान आदी उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत.

चुरशीच्या तिरंगी लढतीचीही शक्यता   

क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अरुण लाड यांनी आजपर्यंत नेहमीच  देशमुखांना साथ दिली आहे. मात्र, यावेळी अरुण लाड  यांचे पुत्र शरद लाड हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ते कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी या खेपेस मैदानात उतरावे आणि जनमत अजमावे, असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. तसे झाल्यास मतदारसंघात लक्षवेधी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.