Tue, Jul 14, 2020 01:46होमपेज › Sangli › सांगलीत आज एकता रॅली : जय्यत तयारी

सांगलीत आज एकता रॅली : जय्यत तयारी

Published On: Jan 14 2018 1:54AM | Last Updated: Jan 13 2018 11:04PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

येथे रविवारी (दि. 14) काढण्यात येणार्‍या  सद्भावना एकता रॅलीची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. या रॅलीवर आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमवर 1 ड्रोन आणि 37 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर असणार आहे. 
जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन या रॅलीचे आयोजन केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील चौकापासून सकाळी नऊ वाजता ही रॅली सुरू होईल. राममंदिर चौक- पंचमुखी मारुती रस्ता- शिवाजी मंडई- महापालिका- राजवाडा चौक- स्टेशन चौक आणि छत्रपती शिवाजी स्टेडियमवर या रॅलीची सांगता होणार आहे.  त्या ठिकाणी एकतेची शपथ देण्यात येणार आहे.  रॅलीसाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार, आमदार, नगरसेवक यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधीं ,  शासकीय कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक, राजकीय, व्यावसायिक संघटना यांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित करण्यात आले आहे. 

मिरज आणि इस्लामपूर मधील  विद्यार्थ्यांना  ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीत सर्वात पुढे पोलिसांचे बँड पथक, एनएसएस, एनसीसीचे विद्यार्थी,  तिरंगा ध्वज, समतेचा संदेश देणारा पोवाडा असणार आहे. पाण्याचे 11 ठिकाणी स्टॉल आहेत. आठ मोबाईल (फिरती) टॉयलेटची व्यवस्था केली आहे. त्या शिवाय 3 रुग्णवाहिका, 11 फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत.  रॅली मार्गावरील सर्व खड्डे मुजवण्यात आले असून गटारी साफ करून घेण्यात आल्या आहेत. 

रॅलीसाठी मिरज मार्गावरून येणार्‍या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था मार्केट यार्डात, इस्लामपूर मार्गावरून येणार्‍या वाहनांसाठी इमॅन्युअल इंग्लिश स्कूल शाळेचे मैदान आणि शहरातील वाहनांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर व्यवस्था केली आहे. सुचना देण्यासाठी वायरलेस साऊंड व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून  सुचना देता येणे शक्य होणार आहे. 

रविवारी रॅलीच्या काळात वाहतूक मार्ग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मार्केट यार्डपासून राममंदिरापर्यंत एकाच रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. राममंदीर ते पंचमुखी -मारुती रस्ता मार्गे रिसाला रस्ता-  मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय या मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे.  त्या शिवाय शिवाजी स्टेडीयम ते मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयापर्यंतची वाहतूकही इतरत्र वळवण्यात येणार आहे. 

स्टेडीयमवर व्यासपीठाच्या डाव्या बाजूला मुले, मध्यभागी महिला आणि डाव्या बाजूला पुरुषांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. आमराईच्या बाजूकडील गेटमधून विद्यार्थ्यांना तर काँग्रेसभवनकडील गेटमधून महिलांना बाहेर पडता येणार आहे.  प्रत्येक शाळेची जबाबदारी एका तहसीलदारांकडे देण्यात आली आहे. विविध संघटना, व्यक्ती यांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांची  भेट घेऊन  पाठिंबा दिला आहे.