Tue, Jul 14, 2020 05:08होमपेज › Sangli › मिरजेत प्रभाग नवे; विरोधकही नवेच

मिरजेत प्रभाग नवे; विरोधकही नवेच

Published On: Jul 13 2018 12:51AM | Last Updated: Jul 12 2018 11:45PMमिरज : जालिंदर हुलवान

राजकारणात कोण कधी विरोधक होईल आणि कोण कधी कोणत्या पॅनेलमध्ये येईल हे सांगता येत नाही. या निवडणुकीतही मिरजेत काही अपवाद वगळता असेच काहीसे घडणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रभाग नवे तसेच विरोधकही नवे असणार आहेत. विद्यमान 27 पैकी मिरजेत 15 विद्यमान नगरसेवक पुन्हा मैदानात उतरले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाले. पक्षांचे उमेदवारही निश्‍चित झाले. मिरजेतील  लढत ही भाजप विरूद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी या आघाडीतच होणार आहे. सन 2013 च्या निवडणुकीमध्ये 78 नगरसेवक होते. त्यापैकी 27 नगरसेवक हे मिरजेत होते. त्यावेळी 13 प्रभाग होते.

या निवडणुकीत मात्र मिरजेत केवळ सहा प्रभाग आहेत. या सहा प्रभागांतून 23 नगरसेवक निवडून जाणार आहेत. विद्यमान नगरसेवकांपैकी 15 जण  मैदानात उतरले आहेत. भाजप 5, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 4  आणि अपक्ष 1 असे एकूण 15 नगरसेवक मैदानात आहेत. भाजपने शांता जाधव, निरंजन आवटी, शिवाजी दुर्वे, संगीता खोत, विवेक कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने धोंडुबाई कलकुटगी, किशोर जामदार, बसवेश्‍वर सातपुते, बबिता मेंढे, संजय मेंढे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने संगीता हारगे, मैनुद्दीन बागवान, मालन हुलवान, अतहर नायकवडी या नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे.   

यापुर्वीच्या निवडणुकांचा अभ्यास करता यंदा मिरजेत नव्या विरोधकांमध्ये लढत होणार आहे. हे स्पष्ट दिसते आहे. गतवेळच्या निवडणुकीत जुबेर चौधरी व अजित दोरकर यांच्यात लढत झाली होती तर शिवाजी दुर्वे यांची लढत सतीश कलकुटगी यांच्याशी झाली होती. आता दोरकर यांची लढत शिवाजी दुर्वे यांच्याशी प्रभाग 3 मध्ये होणार आहे. एकेकाळचे आवटी यांचे कट्टर समर्थक सचिन जाधव हे संदीप आवटी यांच्या विरोधात लढणार आहेत. याच प्रभागात आमदार सुरेश खाडे यांचे निकटवर्तीय मोहन वनखंडे यांच्या पत्नी अनिता वनखंडे यांची लढत प्रतीक्षा सोनवणे यांच्याशी होणार आहे. याच प्रभागात भाजपच्या शांता जाधव यांची लढत यास्मिन चौधरी यांच्याशी होणार आहे. सन 2013 च्या निवडणुकीत जाधव यांची लढत अनिता गोरे यांच्याशी झाली होती. 

सन 2013 च्या निवडणुकीत अनिल कुलकर्णी यांची लढत भाजपचे मकरंद देशपांडे यांच्याशी झाली होती. यंदा मकरंद देशपांडे इच्छुक नाहीत. त्यावेळीही  कुलकर्णी अपक्ष लढले होते. याहीवेळी ते अपक्ष म्हणूनच लढत आहेत. यावेळी त्यांचा सामना प्रभाग चारमध्ये माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्याशी आहे. याच प्रभागात नगरसेवक निरंजन आवटी यांची लढत विवेक शेटे यांच्याशी होणार आहे. सन 2013 च्या निवडणुकीत आवटी यांची लढत महंमद मणेर यांच्याशी झाली होती. याच प्रभागात माजी नगरसेवक अंकुश कोळेकर यांच्या मातोश्री नंदा कोळेकर यांची लढत माजी नगरसेवक सुरेश सलगर यांची सून अस्मिता सलगर यांच्याशी होणार आहे. सलगर व कोळेकर हे यापूर्वी कधीही एकमेकांविरोधात लढलेले नाहीत. याच प्रभागातील दुसर्‍या गटात मुग्धा गाडगीळ, मोहना ठाणेदार, विद्या नलावडे यांच्यात लढत होणार आहे. 

प्रभाग पाचमध्ये नगरसेवक संजय मेंढे यांची लढत भाजपच्या संभाजी मेंढे यांच्याशी होणार आहे. ते दोघेही एकेकाळी एकत्र होते. याच गटात सांगली जिल्हा सुधार समितीचे तानाजी रूईकर  लढणार आहेत. नगरसेविका बबिता मेंढे यांची लढत मीनाक्षी चौगुले यांच्याशी होणार आहे. इद्रीस नायकवडी यांची लढत काँग्रेसचे नेते किशोर जामदार यांचे चिरंजीव करण जामदार व भाजपचे सावंता येवारे, चंद्रकांत मैगुरे यांच्यात होणार आहे. नगरसेविका मालन हुलवान यांची लढत आफरीन रोहिले, सुहाना नदाफ यांच्याशी होणार आहे. नगरसेवक आतहर नायकवडी यांची लढत भाजपच्या उमेश हारगे यांच्याशी होणार आहे. 

प्रभाग सातमध्ये नगरसेवक बसवेश्‍वर सातपुते यांची लढत नगरसेविका शुभांगी देवमाने यांचे पती माजी नगरसेवक आनंदा देवमाने यांच्यात होणार आहे. नगरसेविका धोंडुबाई कलकुटगी यांची लढत नगरसेविका संगीता खोत यांच्यात होणार आहे. खासदार संजय पाटील यांचे समर्थक गजेंद्र कुल्लोळी यांच्या पत्नी गायत्री कुल्लोळी यांची लढत व जयश्री म्हरगुडे, धनगर समाजाचे अध्यक्ष तानाजी हुलवान यांच्या पत्नी मीनाक्षी हुलवान यांच्याशी होणार आहे. नगरसेवक किशोर जामदार यांची लढत भाजपचे गणेश माळी, शिवसेनेचे महादेव हुलवान यांच्यात होणार आहे. गणेश माळी हे पूर्वी किशोर जामदार यांचे समर्थक मानले जात होते. आता ते आमने सामने आहेत.

जामदार-नायकवडी, हारगे-कुरणे, कांबळे-थोरात लढत लक्षवेधी 

काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली पण फक्त प्रभाग 5 मध्ये दोन्ही पक्ष आमने सामने आहेत. येथे इद्रीस नायकवडी व किशोर जामदार यांचे पुत्र करण हे लढणार आहेत. प्रभाग 20 मधून नगरसेविका संगीता हारगे यांची लढत माजी नगरसेविका जयश्री कुरणे यांच्यात होणार आहे. गेल्या निवडणुकीत दोघांमध्येच लढत झाली होती. नगरसेवक विवेक कांबळे व राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात यांच्यात याही वर्षी लढत होणार आहे. या तीनही ठिकाणी निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.