होमपेज › Sangli › संजय पाटील यांचा अन्याय सहन करायचा नाही

संजय पाटील यांचा अन्याय सहन करायचा नाही

Published On: Apr 08 2019 2:02AM | Last Updated: Apr 07 2019 11:12PM
तासगाव : प्रतिनिधी 

लोकसभा निवडणूक ही संधी आहे. आर. आर. पाटील  आणि वसंतदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी राहील. आता संजय पाटील यांचा अन्याय सहन करायचा नाही. तासगाव तालुक्यातूनही मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी ढवळी (ता. तासगाव) येथे व्यक्त केला. 

येथील हनुमान मंदिरात तासगाव तालुक्यातील प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. खासदार  संजय पाटील यांना वाटते आपण काहीही करू शकतो.  कुणालाही दाबू शकतो, ही परिस्थिती खासदार यांनी निर्माण केली आहे. ही चूक आमची आहे, कारण आम्ही सांगलीत अडकून पडलो होतो. ते म्हणाले, खासदार पाटील यांना घरातील व्यक्तिंना चांगली 
वागणूक देता येत नाही. त्यांच्याकडून लोकांनी काय अपेक्षा ठेवायची. गेले साडेचार वर्षे जो अन्याय सहन केला तो परत सहन करायचा नाही. आर.आर. पाटील  आणि वसंतदादांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीशी राहील.  तासगाव तालुक्यातूनही मोठे मताधिक्य मिळेल, असेही ते म्हणाले.

आमदार सुमन पाटील म्हणाल्या, भाजप सरकार शेतकरीविरोधी असून ते परत सत्तेत येता कामा नये. विशाल पाटील उभे आहेत म्हणजे मीच निवडणुकीला उभी आहे, असे समजून भरघोस मताधिक्याने निवडून देण्यासाठी कामाला लागा. 

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सुरेश पाटील, डी. के. पाटील यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील, हणमंतराव देसाई, ताजुद्दीन तांबोळी, विजय पाटील, अमित पाटील, जोतिराम जाधव यांच्यासह राष्ट्रवादी, काँग्रेस आणि स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार तुमचे घरही नावावर करुन घेतील...

विशाल पाटील म्हणाले, तासगाव तालुक्यात खासदार पाटील यांची गुंडशाही वाढली आहे. त्यांनी आमदार सुमन पाटील यांना कोंडून मारण्याचा प्रयत्न केला. तासगाव भोवतीच्या जमिनी दंडूकशाहीने रेटून स्वत: च्या नावावर करुन घेतल्या आहेत, दोन कारखाने घेतले, त्यांनी आपल्या नावावर मोठ्या प्रमाणावर मालमत्ता जमा केली आहे. आता ते उद्या आपल्या गावात येऊन तुमचे घरही नावावर करुन घेतील. त्यावेळी  तुम्ही काही करू शकणार नाही.