सांगली : प्रतिनिधी
माथाडी कायदा मोडीत काढण्याच्या राज्य शासनाच्या हालचालींविरोधात घोषणाबाजी करत हमाल, मापाडी, माथाडी महिलांनी मंगळवारी मार्केट यार्डात माथाडी बोर्डावर मोर्चा काढला. माथाडी कायदा मोडीत काढल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांनी दिला.
माथाडी कायदा मोडीत न काढता त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मंगळवारी राज्य हमाल मापाडी महामंडळ आणि हमाल माथाडी संघटना कृती समितीतर्फे राज्यव्यापी लाक्षणिक बंद आंदोलन झाले. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आझाद मैदानावर उपोषण झाले. हमाल मापाडी महामंडळाचे राज्य सरचिटणीस विकास मगदूम उपस्थित होते. सांगलीत हमाल पंचायत, हमाल मापाडी महामंडळातर्फे मार्केट यार्डात मोर्चा काढण्यात आला. बाळासाहेब बंडगर, बजरंग खुंटाळे, श्रीमंत बंडगर, राजाराम बंडगर, गोविंद सावंत, यशवंत सावंत, शोभा कलगुटगी, शालन मोकाशी, संजय मोरे व हमाल, मापाडी व महिला माथाडी सहभागी होते. माथाडी मंडळाच्या अधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
हमाल, मापाडी, महिला माथाडींच्या बंदमुळे सांगली मार्केट यार्ड, फळे व भाजीपाला मार्केटमधील शेतीमालाची चढ-उतार व व्यापार ठप्प झाला होता. गणपती पेठ, हळद गिरणभाग, औद्योगिक वसाहतीतही हमालांच्या बंदमुळे कामकाजावर परिणाम झाला. बाळासाहेब बंडगर म्हणाले, माथाडी कायद्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच राज्य शासन हा कायदा गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहे. माथाडी कायद्याने हमाल, कष्टकर्यांना खर्य अर्थाने संरक्षण दिले आहे. हा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.