सांगली : प्रतिनिधी
शहरात पाच दिवसांपूर्वी भरदिवसा पाच फ्लॅट फोडून चोरट्यांनी रोकड, दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला होता. त्याशिवाय बसस्थानकावरील चोर्यांचे सत्रही पुन्हा सुरू झाले आहे. या वाढत्या चोर्यांना जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिसांचे दुर्लक्ष जेवढे याला कारणीभूत आहे, तेवढेच नागरिकांचाही निष्काळजीपणा आणि बेफिकीरी कारणीभूत आहे. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांसह नागरिकांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
विश्रामबागमधील दोन सदनिकांमधील पाच फ्लॅट भरदिवसा फोडण्यात आले. आलिशान मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी कटरने कडी-कोयंडे तोडून फ्लॅट फोडले. यावेळी त्या सदनिकांतील एकाही नागरिकाला कटरचा आवाज ऐकू आला नसेल याचे आश्चर्य वाटते. शिवाय सदनिकेसमोर उभ्या केलेल्या आलिशान कारमधून कोणाकडे पाहुणे आलेत, याची साधी चौकशी करण्यात आली नाही. शिवाय सोमवारी चोरी झालेल्या एकाही सदनिकेत सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. यावरूनच त्या सदनिकेतील नागरिकांचा सुरक्षिततेबाबतचा निष्काळजीपणा दिसून येतो.
पोलिस दलातर्फे वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. परगावी जाताना अथवा शहरातच किरकोळ कामासाठी जाताना त्याची कल्पना शेजार्यांना द्यावी, याची खबरदारी घेतली जात नाही. शिवाय अन्य बाबींसाठी ‘मेंटेनन्स चार्ज’ देणारे फ्लॅटधारक सुरक्षा रक्षकासाठी खर्च करू शकत नाहीत का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. सुरक्षा रक्षक परवडत नसेल तर किमान सीसीटीव्ही कॅमेरे तरी या सदनिकांच्या प्रवेशद्वारात बसवण्याची गरज आहे. असे असूनही संबंधितांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
बीट मार्शलच्या झोपा...
शहरातील प्रत्येक उपनगरांमध्ये प्रत्येक पोलिस ठाण्यांकडून बीट मार्शल नेमले जातात. मात्र सोमवारी भर दुपारी फ्लॅट फोडले जात असताना हे बीट मार्शल काय करीत होते, असाही प्रश्न निर्माण होतो. बीट मार्शलना सातत्याने नेमून दिलेल्या परिसरात गस्त घालणे बंधनकारक असताना ते मात्र अन्यच कामात मग्न असल्याचे दिसून आले आहे. शिवाय विश्रामबाग परिसरातील पोलिस मदत केंद्राला सातत्याने टाळेच दिसून येते. त्यामुळे पोलिसांचे दुर्लक्षही या वाढत्या चोर्यांना जबाबदार आहे. याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणार्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.
सीसीटीव्ही कॅमेर्यांचाच आधार
सांगली सुरक्षित बनवण्यासाठी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी महापालिका क्षेत्रात 200 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा संकल्प केला आहे. त्यातील बहुतांश काम पूर्णत्वासही गेले आहे. त्यामुळे आता या चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांना केवळ सीसीटीव्ही कॅमेर्याचाच आधार असणार आहे. दरम्यान फ्लॅट फोडणारे चोरटे आलिशान कारमधून आले होते. शिवाय त्यांची वेशभूषाही आधुनिक होती. त्यामुळे सहजासहजी ते चोर असल्याचे दिसून येत नव्हते. त्यामुळे या चोरट्यांना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
बसस्थानकावरील चोर्यांमध्येही वाढ
फेब्रुवारीच्या मध्यात शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरही चोर्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऐवज नेणारे लोकच चोरट्यांचे नेमके लक्ष्य कसे होतात, याचेही आश्चर्य आहे. नातेवाईकांच्या विवाहासाठी जाताना एका व्यापार्याने मिरज रस्त्यावरील एका दुकानातून दागिने खरेदी केले. चोरट्यांनी त्यांच्यावर त्या दुकानापासून पाळत ठेवली होती. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन त्या दागिन्यांवर डल्ला मारण्यात आला. बसस्थानकापासून काही अंतरावर गेल्यावर बस थांबवून ते चोरटे उतरलेही. मात्र ते अद्यापही पोलिसांना सापडलेले नाहीत.
शेजारधर्मच उरला नाही...
शहरांमध्ये फ्लॅट संस्कृतीचा उदय झाल्यापासून शेजारधर्मच लोप पावल्याचे दिसून येत आहे. सोमवारी भर दुपारी फ्लॅट फोडण्यात आले. यावेळी चोरट्यांनी कटरच्या सहाय्याने कडी-कोयंडे तोडले. याचा आवाज एकाही शेजार्याला गेला नसेल का, शिवाय फ्लॅटमधील तिजोरी फोडतानाचा आवाजही त्यांनी ऐकला नसेल, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तोडफोडीचे आवाज ऐकून एकाने जरी त्याकडे लक्ष देऊन पोलिसांना कळवले असते तर कदाचित चोरटे रंगेहातही सापडू शकले असते. मात्र शेजारधर्मच उरला नसल्याने चोरट्यांचे फावले.