होमपेज › Sangli › भाजप हस्तक भिडे तरुणांची डोकी भडकवतात : प्रतीक पाटील

भाजप हस्तक भिडे तरुणांची डोकी भडकवतात : प्रतीक पाटील

Published On: Apr 09 2018 6:23PM | Last Updated: Apr 09 2018 6:23PMसांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्याकडून चुकीची माहिती दिली जाते. चुकीचा इतिहास सांगून तरुणांची डोकी भडकवली जातात. भिडे गुरुजींकडून मराठा समाजातील तरुणांचे शोषण केले आहे, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री व माजी खासदार प्रतीक पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. सत्ताधारी भाजपशी सबंधित सर्व संघटना समाजाच्या वाटण्या करण्यात मग्न आहेत. भिडे हेही भाजपचे हस्तक आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. 

शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरुजी गेली अनेक वर्षे मराठा व बहुजन समाजातील युवकांच्या शोषणाचे काम पध्दतशीरपणे करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांनाच प्रिय आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल चुकीची माहिती भिडे यांच्याकडून दिली जात आहे. मराठा व बहुजन समाजातील तरुणांना  चुकीचा इतिहास सांगून त्यांची डोकी भडकविण्याचे काम ते करीत आहेत. आता तर ते भाजपचे हस्तक म्हणून काम करीत आहेत, असा आरोप पाटील यांनी केला.

काही दिवस आम्हीही त्यांच्या मोहिमा, दौडीमध्ये सहभागी होत होतो. पण त्यांचे खरे स्वरुप लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांच्यापासून चार हात दूर राहणेच पसंत केले आहे. त्यांचा कोरेगाव-भीमा येथील दंगलीच्या घटनेशी काही सबंध आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र यंत्रणा काम करत आहे.  इतरांसाठी ते कायद्याची  भाषा करतात. पण, आपण मात्र चौकशीला सामोरे जात नाहीत. त्यांना कायद्याची भिती वाटते का? दोषी नसतील तर त्यांनी चौकशीला सहकार्य करून निर्दोषत्व सिध्द करावे. परंतु, त्यांनी याला बगल देवून मराठा व बहुजन युवकांना चुकीच्या पध्दतीने उतरवले. तरुणांनी यापुढे त्यांच्या दिशाभुलीपासून दूर राहावे.

काँग्रेसने सत्तेवर असताना जातीयवादाला कधीच थारा दिला नाही. मात्र, भाजप सरकार समाजात जातीयवादाचे विष पेरत आहे. विरोधकांना संविधानावर बोलूच देत नाहीत. ही लोकशाहीची मुस्कटदाबी आहे. काँग्रेसने दलित, मागासवर्गियांसाठी सुरु केलेल्या सवलती मागच्या दाराने बंद केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली. 

Tags : sangali news, sangali, congress, pratik patil, bhide guruji, sambhaji bhide