Sat, Jul 04, 2020 02:25होमपेज › Sangli › सांगलीवाडीच्या एकास साडेसहा लाखाला गंडा

सांगलीवाडीच्या एकास साडेसहा लाखाला गंडा

Last Updated: Nov 10 2019 11:49PM
सांगली : प्रतिनिधी
फॉरेस्ट विभागात दोन कोटी रुपयाचे टेंडर मिळवून देतो, असे आमिष दाखवून सांगलीवाडी येथील सतीश गजानन पवार (वय 32) यांना साडेसहा लाख रुपयाचा गंडा घातला आहे. याप्रकरणी एका प्राध्यापिकेसह तिघांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  रवींद्र भास्कर लाळगे (रा. साखरवाडी, ता. फलटण), सुनीता रवींद्र लाळगे (रा. नेरूळ, मुंबई)  प्रा. सारिका रामचंद्र कंठे (रा. चंद्रपूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

याबाबत माहिती अशी : पवार यांचा सांगलीवाडी येथे फॅब्रिकेशनचा कारखाना आहे. त्यांची  लाळगे आणि कंठे यांच्याशी दोन वर्षांपूर्वी ओळख झाली. रवींद्र लाळगे याने ‘कंठे या फॉरेस्ट विभागात वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांच्या ओळखीतून तुम्हाला रत्नागिरी येथे 140 किलोमीटर लांबीचे जाळी मारण्याचे 2 कोटी रुपयांचे टेंडर मिळवून देतो. तुम्हाला यात चांगले पैसे मिळतील’, असे पवार यांना सांगितले. त्यानंतर कागदपत्रे आणि 22 हजार रुपये पवार यांच्याकडून घेतले. त्यानंतर दि. 26 ऑगस्ट 2018 ते दि. 26 जून 2019 या कालावधीत सुमारे 6 लाख 40 हजार रुपये वेळोवेळी बँकेतून घेतले. परंतु, पवार यांना टेंडर मिळाले नाही. त्यानंतर ते लाळगे यांच्याकडे पैशाची मागणी करू लागले. मात्र लाळगे आणि कंठे यांनी पैसे देण्यास टाळाटाळ सुरू केली. मोबाईल उचलणे बंद केले. 

मलकापूर येथे कंठे  या आलेल्या आहेत, अशी माहिती पवार यांना मिळाली. त्यानुसार पवार हे मलकापूरला गेले. त्यांनी कंठे आणि त्यांच्या अडीच वर्षाच्या मुलास बरोबर घेतले. कंठे यांच्याकडून आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पवार यांनी कंठे हिला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.  दरम्यान रवींंद्र लाळगे याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

प्राध्यापिका, मुलगा निवेदिता केंद्रात
पवार यांनी प्राध्यापिका कंठे यांना शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून गुन्हा दाखल केला. कंठे यांच्याबरोबरच त्यांचा अडीच वर्षाचा मुलगा आहे. सर्व पोलिस बंदोबस्तात आहेत. त्यामुळे दोघांना येथील भगिनी निवेदिता केंद्रात ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.  

पाचशे रुपये मदत केल्याचा उठविला फायदा
अडीच वर्षांपूर्वी लाळगे आणि कंठे हे दोघे सांगलीवाडी येथील पेट्रोल पंपावर आले होते. पवार यांच्याकडे आम्हाला तेल टाकण्यासाठी 500 रुपयांची गरज असल्याचे सांगितले. काही दिवसांतच दोघे परत आले. तुम्ही पाचशे रुपये आम्हाला मदत करण्यासाठी देवाप्रमाणे धावून आला. आम्ही आता टेंडर मिळवून देण्यासाठी तुम्हाला मदत करतो, असे सांगत त्यांनी पवार यांना गंडा घातला.