Wed, Jul 08, 2020 15:25होमपेज › Sangli › मिरज येथे ८० हज यात्रेकरूंची फसवणूक

मिरज येथे ८० हज यात्रेकरूंची फसवणूक

Published On: May 13 2019 2:11AM | Last Updated: May 13 2019 12:45AM
मिरज : शहर प्रतिनिधी 

हज यात्रेचा परवाना काढून देण्याच्या व यात्रेकरूंना हजला पाठविण्याच्या बहाण्याने मिरजेतील एका ट्रॅव्हल कंपनीला मुंबईच्या एकाने तब्बल 64 लाख 47 हजार 500 रुपयांना गंडा घातला आहे. हजला जाण्यासाठी यात्रेकरूंनी पैसे देऊनही त्यांना हज यात्रेला न पाठविल्याने त्यांचीही फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मिरज गांधी चौकी पोलिसांनी मुंबईतील अल मेहर व अल बुशेर या दोन कंपन्यांचा चालक गुलाम मुर्तुजा अन्सारी (रा. मस्जीद बंदर, मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

याबाबत जुलेखा अब्दुल शेख (रा. कुपवाड रोड, मिरज) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. शेख यांचे मिरजेत आशियाना वर्ल्ड टुर्स नावाची ट्रॅव्हल कंपनी आहे. त्यांना हज यात्रेकरूंना हजला पाठविण्यासाठी परवाना घ्यायचा होता. शिवाय मिरज शहर व परिसरातील 80 यात्रेकरूंनाही हजला पाठवायचे होते. त्यासाठी शेख यांनी 80 हज यात्रेकरूंकडून प्रत्येकी 2 लाख रूपये घेतले होते. ते पैसे जमा झाल्यानंतर त्यांना हजला पाठविण्यासाठी मुंबईच्या अल मेहर व अल बुशेर या दोन कंपन्यांचा चालक गुलाम अन्सारी याच्याकडे शेख यांनी दि. 1 जानेवारी 2017 मध्ये कागदपत्रे व पैसे जमा केले होते. त्यांना सुमारे 1 कोटी 2 लाख 30 हजार रूपये दिले होते. मात्र अन्सारी यांनी त्यांना हज यात्रेसाठी परवाना दिला नाही आणि यात्रेकरूंना हजलाही पाठविले नाही. त्यामुळे शेख यांनी दिलेले पैसे परत मागितले. त्यापैकी 37 लाख 81 हजार 50 रूपये परत दिले होते. अजून 64 लाख 48 हजार 500 रूपये अन्सारी द्यायचा होता. त्याच्याकडे मागणी करूनही त्याने पैसे दिले नाहीत. पैसे देण्यास त्याने टाळाटाळ केली. त्यामुळे शेख यांनी गांधी चौकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अन्सारी याच्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत उपनिरीक्षक डी. एस. कुलकर्णी हे अधिक तपास करीत आहेत.