Sun, Jul 05, 2020 16:43होमपेज › Sangli › भारत आता घाबरणार नाही, तर घाबरवणारा देश : देवेंद्र फडणवीस

भारत आता घाबरणार नाही, तर घाबरवणारा देश : देवेंद्र फडणवीस

Published On: Apr 17 2019 8:39PM | Last Updated: Apr 17 2019 8:39PM
जत (जि. सांगली) : शहर प्रतिनिधी

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोकसभा निवडणुक महत्त्वाची आहे. ही निवडणूक गल्लीतली नसून दिल्लीतील आहे. आजवरच्या कुठल्याच सरकारला देशाच्या सुरक्षेची काळजी नव्हती. पण गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने देश सुरक्षेला अधिक महत्त्व दिले. भारत आता घाबरणार नाही तर घाबरणारा देश आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि देशाची सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाला साथ द्या असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस फडणवीस यांनी केले. 

संख (ता. जत) येथे भाजप, शिवसेना, रिपाई, रा स प,  शिवसंग्राम रयत क्रांती संघटना, महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित विजय संकल्प सभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी आमदार विलासराव जगताप,  आमदार सुरेश खाडे, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, प्रकाश जमदाडे,  तमन्नागोंडा रवी पाटील,  डॉ. रवींद्र आरळी,  चंद्रकांत गुड्डोडगी, अमृतानंद स्वामी, अजितकुमार पाटील,  श्रीपाद अष्टेकर,  शिवाजीराव ताड, उमेश सावंत,  सुनिल पवार, शंकर वगऱे,  रिपाईचे संजय कांबळे, आर के पाटील, अंकुश हूवाळे उपस्थित होते 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात व राज्यात महायुतीचे सरकार येताच  विकासाचे नवे पर्व आम्ही सुरू केले. केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात देशाच्या विकासाला चालना दिली. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून योजनांची अंमलबजावणी केली. हे करत असताना देशाच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केले. या देशात युपीए सरकार असताना अनेक दहशतवादी हल्ले झाले, किडामुंगीसारखे लोक मरत होते पण पंतप्रधान देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही निर्णय घेत नव्हते. याउलट मोदी सरकारने ज्या वेळी भारतावर कोणी तिरकी नजर केली तर त्याचावर करारजबाब देण्याचे काम त्यांनी केले.  

पुलवामा हल्ला असो अथवा उरीचा हल्ला यावेळी जवानांनी देशाची ताकद दाखवून दिली. आजपर्यंत जगाच्या पाठीवर इस्रायल, अमेरिका हे दोनच देश आपल्या देशाच्या जवानावर आणि सीमेवर होणार्‍या हल्ल्यांचे उत्तर देत होते. पण यात भारताचाही क्रमांक लागला आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना देशाचे हीत समोर ठेवलं पाहिजे असेही फडणवीस म्हणाले.

‘‘मुख्यमंत्री झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक योजना बंद पडल्या होत्या या योजनांना गती देण्याचे काम या भाजप शिवसेना सरकारने केलेले आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील सर्व योजनांना निधी देण्याचे काम आम्ही केलं. पश्चिम महाराष्ट्रातील ताकारी,  टेंभू, म्हैशाळ योजना पूर्णत्वास नेले आहेत.  कृष्णा खोरेचे महामंडळाची जबाबदारी संजय पाटील यांच्याकडे सोपवली. निधीही उपलब्ध करून दिला. संजय पाटील व आमदार जगताप यांनी या भागात मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे करून दाखवली  आहेत. बंदिस्त पाइपलाइनने पाणी देण्याचे नियोजन करून आम्ही मायक्रो इरिगेशन सिस्टीम आणली आहे. यामुळे सिंचन दीड पटीने वाढले आहे तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय  19 टक्के म्हैशाळ योजनेचे बिल हे शेतकऱ्यांनी  तर 81% हे सरकार भरत आहेत.  यानंतर या योजना सोलारवर  चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे पैसे कमी  आणि कमी पैशात पाणी मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही प्रस्थापितांना विस्थापित केले विस्थापितांना सोबत  हा भाग काँग्रेसमुक्त केला. ज्या कॉंग्रेसला सांगलीला बालेकिल्ला म्हणत होता आज काँग्रेस कार्यालयाला कुलूप लागले आहे.’’ अशी टीकाही फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.  

पुढे बोलताना फडणवीस म्‍हणले, ‘‘वसंत दादांनी  महाराष्ट्रात मोठे काम उभे केले. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात याच सांगलीत एकही कार्यक्रम झाला नाही पण आम्ही सरकारमध्ये एक समिती गठीत करून स्वर्गीय वसंतदादांची शताब्दी वर्ष साजरे केले. अनेक कार्यक्रम राज्य सरकारने राबवले त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही वसंतदादांचा  विकासात्मक  विचारांचा वारसा चालवला आहे. यावेळी काँग्रेसला दादांच्या वारसांनी  लाथ मारली पाहिजे होती.’’ 

धनगर समाजाला आदिवासींच्या सवलती 
राज्यात आम्ही धनगर  समाजाला आदिवासींच्या सवलती दिल्या आहेत. सर्वच बाबतीत या समाजाला आदिवासींच्या सवलती देणारे पहिले सरकार आमचे आहे. त्यासोबत मराठा,  लिंगायत, मुस्लिम समाजाचे प्रश्न मार्गी लावले आहेत. आजवर अनेक वर्षे आघाडीचे सरकार होतं. त्यावेळी कोणतेच हिताचे निर्णय झाले नाहीत. पण सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आमच्या सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे लोकांमध्ये या प्रकाराविषयी मोठा विश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंध राज्यात भाजप सेना सरकारला वाढता पाठिंबा आहे. असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्‍त केला.  

काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका
काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीवर टीकास्त्र सोडताना मुख्यमंत्री म्‍हणाले, ‘‘ही आघाडी नव्हे तर महाखिचडी आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवाले देशद्रोहाचे कलम रद्द करायला निघाले आहेत. तिकडे काश्मीरमधील भारतीय जवानांचे विशेषाधिकार काढून टाकण्याची भाषा वापरतात. कलम 124 हे देखील रद्द करण्याचा विचार ते मांडत आहेत. याची कसलीही तमा न असणाऱ्या या खिचडीला आपण वेळीच रोखले पाहिजे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आणि आमचे सांगली लोकसभा उमेदवार संजय पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन त्‍यांनी यावेळी केले.