होमपेज › Sangli › संभाजी भिडे, एकबोटेंची नार्को टेस्ट करा

संभाजी भिडे, एकबोटेंची नार्को टेस्ट करा

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:06PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेप्रकरणी  शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नार्को टेस्ट करा आणि त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी कळंबी येथील वीर सिद्धनाक यांचे वंशज, शहरातील विविध संघटनांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

यावेळी वीर सिद्धनाक यांचे वंशज प्रमोद इनामदार,  प्रसाद इनामदार, अभिजित इनामदार, राहुल इनामदार, मिलिंद इनामदार, प्रकाश इनामदार,  सुरेश दुधगावकर, प्रमोद कुदळे, नितीन गोंधळे, आसिफ बावा, शाहीर पाटील किरणराज कांबळे आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, भीमा- कोरेगाव प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यात  जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. संभाजी भिडे हे हिप्नॉटीझम करून लोकांना भडकवण्याचे काम करतात. जाती-जाती आणि धर्मात भांडणे लावून फूट पाडण्याचे काम सुरू आहे. त्यातूनच आमच्यातील एका व्यक्तीला बरोबर घेऊन वीर सिद्धनाकांचे वंजश हे त्यांच्याबरोबर असल्याचा भास निर्माण करीत आहेत.  प्रकाश आंबेडकरांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांची मागणी अत्यंत चुकीची  आहे. 

ते म्हणाले, महाराष्ट्र बंद नंतर पोलिस अधीक्षकांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले होते. तरी सुद्धा शिवप्रतिष्ठानने रॅली काढली. त्यांना प्रशासनाने मानसन्मानाची वागणूक दिली. याउलट ज्या ठिकाणी दलित  राहतात, त्या भागात पोलिसांचे संचलन करून लोकांना भयभीत करण्याचा प्रयत्न केला. यावरून सरकारचा प्रशासनावर दबाव आहे, हे स्पष्ट होते. संशयित आरोपींना प्रशासनाने मानसन्मान देऊ नये. या सर्व प्रकाराचा आम्ही निषेध करतो.
एकता रॅलीत सक्रिय सहभाग घेणार

सांगलीत रविवारी होणार्‍या  एकता रॅलीत  आम्ही सर्वजण सक्रिय सहभागी होणार आहोत.  लोकांच्यात शांतता आणि  एकोपा निर्माण व्हावा, अशी आम्हा सर्वांची अपेक्षा आहे.  त्यासाठी प्रशासनाला आम्ही सर्व ते सहकार्य करणार आहोत. या रॅलीमध्ये सर्व समाजाने सहभागी व्हावे, असे विविध संघटनांनी आवाहन केले आहे.