होमपेज › Sangli › मिरज : रेल्वेच्या आरोग्य निरीक्षकावर खूनी हल्ला

मिरज : रेल्वेच्या आरोग्य निरीक्षकावर खूनी हल्ला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मिरज : प्रतिनिधी

रेल्वे स्थानकातील आरोग्य निरीक्षक संजीवकुमार ऊर्फ संजयसिंग (वय 34) यांच्यावर स्थानकातील स्वच्छता कर्मचार्‍यांच्या ठेकेदाराने अन्य दोघांच्या मदतीने खुनी हल्ला केला. शुक्रवारी दुपारी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला.  संजीव कुमार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हल्ल्याच्या प्रकारानंतर ठेकेदार आणि  त्याचे अन्य दोघे साथीदार  पसार झाले आहेत.

संजीवकुमार यांना मारहाणीच्या निषेधार्थ स्वच्छता कर्मचार्‍यांनी रेल्वे स्थानकासमोर थ्री स्टार कंपनीच्या जर्सीची होळी करून घोषणाबाजी केली.  मारहाण करणार्‍यांवर कारवाई होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.रेल्वे स्थानकातील प्लॅटफार्म क्र. 2 वर संजीव कुमार यांचे कार्यालय आहे. दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास स्वच्छता कर्मचार्‍यांचा ठेकेदार आणि त्याचे अन्य दोघे साथीदार असे तिघेजण त्यांच्या कार्यालयात घुसले.  आतून दरवाजा बंद करुन लाकडी दांडका व लोखंडी फावड्याने त्यांनी संजीवकुमार यांना जबर मारहाण केली. 

संजीवकुमार यांचा आरडाओरडा ऐकून रेल्वे कर्मचारी आणि ठेकेदाराचे स्वच्छता कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली.   त्यांना मारहाणीपासून वाचविले.
रेल्वेकडून स्थानकातील स्वच्छतेचा ठेका अ‍ॅपकॉन या कंपनीकडे दिला आहे. अ‍ॅपकॉन कंपनीने कराड येथील थ्री स्टार या स्वच्छता कर्मचारी पुरविणार्‍या ठेकेदाराकडे मिरज स्थानकातील स्वच्छतेचे काम सोपविले आहे. या ठेकेदाराकडे सुमारे 50 कर्मचारी काम करीत आहेत.

आरोग्यनिरीक्षकांनी स्थानकातील स्वच्छता कामाबाबत काटेकोर तपासणी सुरू केल्यानंतर बर्‍याचवेळा शिवीगाळ, दमदाटीचा प्रकार करुन दहशत माजविण्याचे प्रकारही यापूर्वी घडले होते. परंतु पोलिसांत तक्रार नसल्याने संबंधीतांविरुद्ध कोणतीही कारवाई होत नसे. अधिकारी-ठेकेदार यांच्यातील वादाचे रुपांतर शक्रवारी मारहाणीत झाले.  संजीवकुमार यांना डोक्यात, चेहर्‍यावर गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला. या प्रकारामुळे रेल्वे अधिकारी, कर्मचारीही भयभीत झाले होते. स्वच्छता कर्मचार्‍यांनी ठेकेदाराच्या निषेधार्थ घोषणाबाजी करुन  कारवाई करण्याची मागणी केली. स्थानकासमोर येऊन ठेकेदाराच्या थ्री स्टार जर्सीची  होळी केली. 
पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधीत ठेकेदार व त्याच्या साथीदारावर कारवाई केली जाईल असे सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पवार यांनी सांगितले.
 

Tags : Miraj,  Miraj News, crime,  Railway, Railway Health Inspector, attack, 


  •