Tue, Jul 14, 2020 05:45होमपेज › Sangli › पारंपरिक प्रतिस्पर्धीच पुन्हा आमनेसामने

पारंपरिक प्रतिस्पर्धीच पुन्हा आमनेसामने

Published On: Mar 14 2019 2:05AM | Last Updated: Mar 14 2019 2:05AM
कडेगाव : रजाअली पिरजादे

लोकसभा निवडणूक जाहीर झाली  आहे.  या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत होणार आहे.  पलूस - कडेगाव हा काँग्रेससाठी हुकमी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र यावेळी देखील मतदारसंघात पुन्हा एकदा पारंपारिक प्रतिस्पर्धीच आमनेसामने येणार आहेत. 

पलूस- कडेगावी विधानसभा मतदारसंघ डॉ. पतंगराव कदम यांचा बालेकिल्ला मानला जातो. डॉ. कदम यांच्या निधनानंतर त्यांचे सुपूत्र, आमदार डॉ. विश्‍वजित कदम हे या मतदारसंघाची धुरा सांभाळत आहेत.  या मतदारसंघातील निवडणूकीचा इतिहास पहिला असता प्रत्येक निवडणुकीत कदम विरुद्ध देशमुख अशाच राजकीय लढती येथे रंगल्या आहेत.काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या  विधानसभा निवडणुकीत देखील अशीच लढत या मतदारसंघात रंगणार हे निश्‍चित आहे. त्याचीच रंगीत तालीम म्हणून  लोकसभा निवडणुकीत हे पारंपारिक प्रतिस्पर्धी विधानसभेची तयारी करत आहेत. 

सांगली लोकसभा मतदारसंघात आघाडीतर्फे  आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांचे नाव आघाडीवर होते, परंतु त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. यामुळे आता या मतदारसंघात काँग्रेसकडून विधानसभेसाठी आमदार डॉ.विश्‍वजित कदम तर भाजपकडून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे.पलूस-कडेगाव मतदार संघाने नेहमीच काँग्रेसला झुकते माप दिले आहे. परंतु पृथ्वीराज देशमुख यांनी मागील निवडणूकीत भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर या भागातील  राजकीय समीकरणे बदलली आहेत. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांनी आजपर्यंत नेहमी पृथ्वीराज देशमुख यांना मदत केली आहे. परंतु आता काँग्रेस - राष्ट्रवादी यांची आघाडी झाल्याने  लाड यांना आता काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांची भूमिका यावेळी  महत्वाची ठरणार आहे. मध्यंतरी लाड यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी चर्चेत होते. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे भाजपकडून लोकसभेसाठी नाव आघाडीवर होते. 
दरम्यान,  या मतदारसंघात शिवसेनेची ताकत नगण्य आहे.शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते हे कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील  आहेत. भाजप - शिवसेना युती झाल्याने  सेनेची भूमिकाही महत्वाची राहणार आहे. 

लोकसभेसाठी भाजपकडून जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचेही नाव पुढे करण्यात आले आहे. तर खासदार  संजय   पाटील यांचे नाव निश्‍चित असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेसाठी अद्याप दोन्ही पक्षांतून उमेदवार जाहीर झालेले नाहीत.  तरी पलूस-कडेगाव मतदार संघात विधानसभेला कोण हे निश्‍चित झाले आहे. यामुळे  लोकसभेच्या निमित्ताने  विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.काँग्रेसचे नेते माजी मंत्री (स्व.) डॉ.  पतंगराव कदम यांच्या निधनानंतर  हि पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूकीत  आमदार मोहनराव कदम आणि आमदार डॉ.विश्‍वजित कदम यांच्यावर मोठी जबाबदारी राहणारी आहे. 

आजपर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत नेहमीच काँग्रेसला  मोठी साथ दिली आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी वडिलांच्या पावलावर पाउल ठेवून या मतदार संघाचा आणि पर्यायाने जिल्ह्याच्या विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरु केले आहेत.  दुसरीकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे करण्याचा प्रयत्न केला आहे.  हा मतदारसंघ नेहमीप्रमाणे आपला लौकिक पुढे चालू ठेवले असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.  या मतदारदारसंघात पुरुष मतदार  1 लाख 38 हजार 907 तर महिला मतदार 1 लाख 35 हजार 726 आहेत. एकूण मतदारसंख्या  2 लाख 74 हजार 638 इतकी आहे.

पलूस-कडेगाव चर्चेतील मतदारसंघ 

माजी मंत्री स्व.आमदार डॉ.पतंगराव कदम हे आघाडी शासनाच्या काळात मंत्री असताना विकास कामाबाबत हे मतदारसंघ सातत्याने चर्चेत राहिले.त्यानंतर डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र डॉ.विश्‍वजित कदम यांची बिनविरोध आमदार नवड झाली. यावेळी देखील संपूर्ण महारष्ट्रात याबाबत चर्चा झाली. सध्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार म्हणून आमदार डॉ.विश्‍वजित कदम यांचे नाव चर्चेत राहिले. तर भाजपाकडून भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व राष्ट्रवादी पक्षाकडून अरुण लाड यांचे नाव चर्चेत राहिले आहे.