Wed, Jul 15, 2020 23:55होमपेज › Sangli › जि. प. सभेत दुष्काळावरून सदस्य आक्रमक

जि. प. सभेत दुष्काळावरून सदस्य आक्रमक

Published On: Dec 01 2018 1:06AM | Last Updated: Dec 01 2018 1:06AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच चार्‍याचा प्रश्‍नही गंभीर बनला आहे. मात्र दुष्काळ निवारण उपाययोजना सुरू नाहीत. अनेक गावांमधून टँकरची मागणी होत आहे, पण प्रशासन दाद देत नाही. ही स्थिती अशीच राहिली तर दुष्काळग्रस्तांचा उद्रेक होईल, असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेतला. दुष्काळ निवारण उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेत तातडीने विशेष सभा बोलविली जाईल. खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांना या सभेचे निमंत्रण दिले जाईल, असे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. 

जिल्हापरिषदेची सर्वसाधारण सभा विटा येथे झाली. संग्रामसिंह देशमुख अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, ब्रह्मदेव पडळकर, तम्मनगौडा रवि-पाटील, प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे तसेच सदस्य व खातेप्रमुख, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे. खरीप आणि  रब्बी हंगाम वाया गेला आहे. पिण्याचे पाणी,  चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे पडून असल्याकडे सदस्य सरदार पाटील, प्रमोद शेंडगे यांनी लक्ष वेधले. शासनाने दुष्काळ जाहीर केला, पण उपाययोजना केव्हा राबविणार, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. टँकर मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयात न ठेवता ग्रामसेवक, तलाठीस्तरावर ठेवावेत, अशी मागणी सदस्यांनी केली. जिल्हा परिषद सभेत केवळ चर्चा करून प्रश्‍न सुटणार नाही. खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत स्वतंत्र बैठक बोलवावी, अशी मागणी डी. के. पाटील यांनी केली.  गावनिहाय पाऊस किती पडला यावरून दुष्काळी जाहीर केला जावा व उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी सत्यजित देशमुख यांनी केली. टँकरने पाणीपुरवठा करताना  जनावरांच्या पाण्याचा विचार झाला पाहिजे, अशी मागणी स्नेहलता जाधव यांनी केली.   

जतमधील 40 गावांना कर्नाटकमधून पाणी द्या

कर्नाटक सीमावर्ती भागात जत तालुक्यातील 40 गावांना कर्नाटकमधील येतनाळ कालव्यातून पाणी द्यावे. त्याबदल्यात कर्नाटकला महाराष्ट्राच्या वाट्याचे एक टीमएसी पाणी द्यावे, अशी मागणी सरदार पाटील यांनी केली. दरम्यान याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे अध्यक्ष   देशमुख यांनी सांगितले. 

जतचा टँकर आटपाडीकडे पाठविला

जत तालुक्यात पाणी टंचाई गंभीर आहे. टँकरची मागणी वाढत आहे. पण जत तालुक्यातील शासकीय टँकर आटपाडीला पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून गेल्याकडे लक्ष वेधत सरदार पाटील यांनी संताप व्यक्त केला.  

निधीत आमदार, खासदारांच्या घुसखोरीवरून संताप

जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेकडील योजना, कामांसाठी येणार्‍या निधीत आमदार, खासदारांच्या ‘घुसखोरी’ विरोधात सदस्य जितेंद्र पाटील यांनी जोरदार आवाज उठविला. जिल्हा परिषदेकडे आलेल्या निधीतील 40 टक्के कामे आमदार, खासदारांच्या शिफारशीवरून होत आहेत. जिल्हा परिषद सदस्यांना मात्र निधी मिळत नाही. घटनादुरुस्तीने जिल्हा परिषदेला दिलेल्या अधिकारांचे जतन करण्यासाठी कडक पवित्रा घेतला पाहिजे, अशी मागणीही पाटील यांनी केली. 

‘अंशदान’ च्या हिशेब चिठ्ठ्यांवरून धारेवर 

प्राथमिक शिक्षकांच्या पगारातून अंशदान पेन्शन योजनेंसाठी कपात होत असलेल्या रकमेच्या हिशेबचिठ्ठया  2015-16 पर्यंतच्याच आहेत. शासन हिस्सा व व्याजाचा हिशेब अद्याप न केल्यावरून सदस्य जितेंद्र पाटील यांनी शिक्षणाधिकारी यांना धारेवर धरले. ही बाब अध्यक्ष देशमुख यांनी गांभीर्याने घेत कपात रकमांचा हिशेब अद्यावत करण्याच्या सुचना दिल्या.