Fri, Sep 20, 2019 22:03होमपेज › Sangli › ‘म्हैसाळ’चे पाणी विकतच घ्यावे लागणार

‘म्हैसाळ’चे पाणी विकतच घ्यावे लागणार

Published On: Apr 08 2018 2:16AM | Last Updated: Apr 07 2018 7:58PMआरग : औदुंबर जाधव

भविष्यात पाण्याची किंमत वाढतच जाणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढविणे, पाण्याची साठवण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागणार आहे. ‘म्हैसाळ’चे पाणी कायमस्वरूपी मिळणार याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर या योजनेचे पाणी विकतच घ्यावे लागणार आहे.

म्हैसाळ प्रकल्पाचे पहिल्यांदा आवर्तन सुरू झाले. तेव्हापासून माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी वारंवार सूचना केल्या आहेत. पाणी जपून वापरा, पाण्याचे योग्य नियोजन करा, वार्षिक पिकाऐवजी नगदी पिके घ्या, पाण्याची साठवण क्षमता वाढवण्याकडे लक्ष द्या पण याकडे कोणी लक्ष दिले नाही. दुष्काळाच्या झळा वाढू लागल्या की, टंचाई निधीचा वापर करून पाणी सोडण्यात येते. पाण्याची मागणी वाढली, अन् त्याची थकबाकी देखील वाढतच गेली. 
यावेळी तर 34  कोटीची वीजवितरणची थकबाकी झाली आहे. त्यापैकी राज्य शासनाने 15 कोटी रुपये भरले आहेत. त्यामुळे ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू झाले, अन्यथा या सार्‍या भागात दुष्काळ  जाहीर करावा लागला असता. सध्या एकरी बाराशे रुपये भरून शेतीसाठी पाणी मिळविण्याची धडपड शेतकरी करीत आहे. मात्र पाणी साठवण करण्यासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने पाणी वाया जाते, याकडे दुर्लक्ष होत आहे. पाटबंधारे विभागाने मागणीनुसार पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. पर्यायी व्यवस्थेसाठी 24 तासासाठी पाणी हवे असल्यास 64 हजार भरावे लागणार आहेत. 

मिरज पूर्व भागात भोसे येथील पाझर तलाव क्षमता 30 द. ल. घ. फूट , आरग येथील पाझर तलाव क्षमता 21 द. ल. घ. फूट, लिंगनूर येथील पाझर तलाव क्षमता 61 द. ल. घ. फूट क्षमता असणारे पाझर तलाव आहेत. या तलावामध्ये पाणी सोडण्याची मागणी होत आहे. त्यामुळे त्या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेती पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. मागील काही वर्षांमध्ये पाऊसमान कमी झाल्याने वेळेपूर्वीच पाझर तलाव कोरडे पडू लागले होते. त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या या भागाला जाणवू लागली. 

लिंगनूर येथील पाझर तलावासह त्या गावाने साखळी बंधारे शेततळी बांधून पाणी साठवण क्षमता वाढवली.  लिंगनूरसह खटाव, संतोषवाडी या गावांना शेतीसह पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. तालुक्यात पाणी साठविण्याचे व योग्य प्रमाणात वापरण्याचे नियोजन कसे असावे याचा आदर्श इतर गावांनी घेण्याची आता गरज आहे.  म्हैसाळ प्रकल्पाच्या लाभ  मिरज पूर्वभागातील 26 हजार हेक्टर क्षेत्राला होतो. मात्र योग्य नियोजन व प्रकल्पाला लागलेली गळती यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पठारी भाग या पाण्यापासून आजदेखील वंचित आहे. या भागाला पाणी मिळावे यासाठी पोट कालवे काढण्यात आले. पण काही पूर्ण आहेत. काही अर्धवट अवस्थेत राहिल्याने या भागाला पाणी मिळत नाही. पाणी साठवण क्षमता वाढविणे, भूजल पातळी वाढवणे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

Tags : Sangli, You, buy, water, Mhaisal