Wed, Jul 15, 2020 22:22होमपेज › Sangli › सांगलीच्या मैदानात उतरणारच : गोेपीचंद पडळकर

सांगलीच्या मैदानात उतरणारच : गोेपीचंद पडळकर

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 29 2019 8:14PM
विटा : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघात मी निवडणूक लढवणार हे निश्‍चित आहे. फक्त पक्ष आणि चिन्ह कोणते ते नंतर जाहीर होईल, असे भाजपचे एकेकाळचे स्टार प्रचारक गोेपीचंद पडळकर यांनी सांगितले. 
खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीतर्फे सांगलीत लढण्यासाठी विचारणा केली आहे. मात्र कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्या विचाराने निर्णय घेतला जाईल. मात्र कोणत्याही परिस्थितीत दि. 3 एप्रिलरोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार हे निश्‍चित आहे.

दरम्यान, विटा येथे गुरुवारी पडळकर समर्थक कार्यकर्त्यांची बैठक झाली. जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, आमच्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांच्या दृष्टीने गोपीचंद पडळकर हाच पक्ष आहे. जनतेच्या पाठबळावर निवडणूक लढविण्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे अफवांवर विश्‍वास न ठेवता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे.
ते म्हणाले, जिल्ह्यातील  कार्यकर्ते आणि आमच्यावर प्रेम करणार्‍या जनतेशी संवाद साधून दोन दिवसांत भूमिका जाहीर केली जाईल.  माजी समाजकल्याण सभापती किसन जानकर, माजी नगरसेवक शिवाजी हारगुडे, राजू जानकर, संग्राम माने, शरद बाबर, मंथन मेटकरी, सुहास पाटील, भालचंद्र कांबळे, सत्यजित पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या  संख्येने उपस्थित होते.