Tue, Jul 07, 2020 21:02होमपेज › Sangli › सांगलीचा खासदार कोण; आज फैसला

सांगलीचा खासदार कोण; आज फैसला

Published On: May 23 2019 1:43AM | Last Updated: May 23 2019 1:43AM
सांगली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघात   महायुतीचे खासदार संजय पाटील, स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे  गोपीचंद पडळकर यापैकी कोण बाजी मारणार,  याचा फैसला गुरुवारी होत आहे. सांगलीचा खासदार ठरविण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष आहे.

 2014 मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या संजय पाटील यांनी काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्‍ला 2 लाख 39 हजार मताधिक्क्याने काबीज केला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही सांगली, मिरजेबरोबरच जत, खानापूर-आटपाडी, शिराळा मतदारसंघांमध्ये भाजप-सेनेने बाजी मारत तब्बल 5 जागा पटकाविल्या होत्या. कडेगावमध्ये काँग्रेस नेते (कै.) पतंगराव कदम, तासगाव-कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादीचे (कै.) आर. आर. पाटील आणि  इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर जिल्हा परिषद, ग्रामपंचायती, पंचायत समिती, 
नगरपालिका आणि महापालिकेमध्ये भाजपने सर्वाधिक यश मिळवत सत्ताकेंद्रे काबिज केली होती. त्यानुसार भाजप जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष बनला.

या लोकसभा निवडणुकीतही सांगलीची जागा एकहाती जिंकणार, असा निवडणुकीपूर्वी दावा केला होता. परंतु भाजपमध्ये संजय पाटील यांच्याबद्दल नाराजी प्रकट होत होती.त्याचवेळी  महाआघाडीचा पाठिंबा असलेले  स्वाभिमानीचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे  गोपीचंद पडळकर यांनी  आव्हान उभे केले. आता संजय पाटील यांच्यासाठी भाजपची ताकद   पणाला लागली आहे. दुसरीकडे भाजपला धक्का देऊन  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्वाभिमानीनेही विशाल पाटील यांच्यासाठी ताकद पणाला लावली आहे.  वंचितांचे नेतृत्व करीत गोपीचंद पडळकर यांनीही जोरदार टक्कर दिली आहे. एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. मात्र तिरंगी लढत चांगलीच रंगली. 11लाख 38 हजार मतदारांनी सांगलीचा खासदार कोण ठरणार, ते आज मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. 

हातकणंगलेचा फैसला शिराळा, इस्लामपूरवर

हातकणंगले मतदारसंघात स्वाभिमानीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, शिवसेना-भाजप महायुतीचे धैर्यशील माने यांच्यात दुरंगी लढत आहे. तिथे शिराळा व वाळवा विधानसभा मतदारसंघाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेट्टी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजित देशमुख यांच्यासह घटकपक्षांच्या नेत्यांनी ताकद पणाला लावली आहे. माने यांच्यासाठी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, कै. नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी जोरदार प्रचार केला आहे. त्यामुळे शिराळा-वाळव्याचे मताधिक्य कोणाच्या पारड्यात पडते, यावर हातकणंगलेचा खासदार ठरणार आहे.