Wed, Jul 15, 2020 16:25होमपेज › Sangli › जयंतरावांच्या विरोधात मैदानात कोण ?

जयंतरावांच्या विरोधात मैदानात कोण ?

Published On: Jul 23 2019 1:19AM | Last Updated: Jul 22 2019 10:16PM
इस्लामपूर : मारूती पाटील

इस्लामपूर विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात राज्यमंत्री  सदाभाऊ खोत यांनीच रिंगणात यावे, यासाठी त्यांच्यावर पक्षांतर्गत व स्थानिक विरोधकांकडून दबाव वाढतो आहे. चुरशीच्या लढतीसाठी विरोधकांकडून मातब्बर व ताकदीच्या उमेदवाराचा विचार व्हावा, अशीही अपेक्षा विरोधकांतून व्यक्त होत आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजपची उमेदवारी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना की नगराध्यक्ष निशिकांत भोसले - पाटील यांना मिळणार याबाबत तालुक्यात उत्सुकता आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मात्र जयंत पाटील यांच्या विरोधात खोत यांनीच उभे रहावे, यासाठी विकास आघाडीच्या इतर नेत्यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. 
नगराध्यक्ष  पाटील यांनी  भाजपची उमेदवारी आपणालाच मिळणार, असा दावा करीत गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात वातावरण निर्मिती केली आहे. विकास आघाडीच्या इतर नेत्यांना विश्वासात न घेता नगराध्यक्ष   पाटील यांनी  विधानसभेची तयारी सुरू केली असल्याचा आरोप करीत इकडे आघाडीतील इतर गटांनी नगराध्यक्ष पाटील यांना शह देण्यासाठी त्यांना वगळून बैठक घेतली. या बैठकीत आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी सुकाणू समितीही नेमली. या समितीचे अध्यक्ष भीमराव माने यांना केले आहे. 

विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पाटील यांच्याबरोबरच युवक नेते राहुल महाडिक, गौरव नायकवडी, वैभव शिंदे आदीजण इच्छुक आहेत. तर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे इच्छुकांची संख्या वाढत असताना ना. खोत यांनीही भाजपने उमेदवारी दिल्यास आपण मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले होते. आता नगराध्यक्ष  पाटील यांना शह देण्यासाठी  विकास आघाडीकडून खोत यांचे एकमुखी नाव पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. आघाडीच्या इतर नेत्यांनीही निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढविला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपकडे गेला तर इथून उमेदवारी  खोत यांना देणार की नगराध्यक्ष पाटील यांना याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

आघाडीत बिघाडी...?

आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात आमचा एकच उमेदवार असल्याचे ना. सदाभाऊ खोत यांनी जाहीर केले आहे. मात्र उमेदवारीवरून विकास आघाडीत बिघाडी निर्माण झाल्याचे सध्या चित्र दिसत आहे. तुर्तास काहीजण रिंगणात येण्यासाठी झटत आहेत, काहींनी तयारी केली आहे.