होमपेज › Sangli › मिरजेत सावकारी डंख थांबणार कधी ?

मिरजेत सावकारी डंख थांबणार कधी ?

Published On: Aug 24 2018 12:47AM | Last Updated: Aug 23 2018 7:06PMमिरज : जालिंदर हुलवान

मिरज शहरासह ग्रामीण भागात बेकायदा सावकारांचा धुमाकूळ आजही सुरूच आहे. पैशासाठी नडलेल्या गरजूंना हेरून त्यांना पैशाचा पुरवठा करून त्यांच्या शेतजमिनी, प्लॉट, प्लॅट, घर अशा मालमत्ता हडप करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. एकीकडे असे प्रकार वाढत असताना दुसरीकडे पोलिस मात्र कारवाई करत नाहीत. पोलिसांचीच साथ या सावकारांना असल्याने सावकारी फोफावत चालली आहे. सावकारी परवाने देणार्‍या आणि त्यावर नियंत्रण ठेवणार्‍या जिल्हा उपनिबंधकांनी व पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला पाहिजे. हा सावकारी डंख कधी थांबणार असा सवाल होतो आहे. 

एकेकाळी सांगली जिल्ह्यात सहकाराची गंगाच वाहत होती. बँका, पतसंस्थांच्या माध्यमातून अनेकांना आपल्या गरजा भागविता येत होत्या. त्यामुळे सावकारी फारशी चालत नव्हती. ती बंद होती असे नाही. पण सावकारीचे प्रमाण खूपच कमी होते. त्यावेळी जिल्ह्यात अगदी बोटावर मोजण्याइतकेच सावकार होते. आता मात्र सहकाराला घरघर लागली. अनेक बँका बुडाल्या. अनेक पतसंस्था बंद पडल्या. त्यामुळे सावकारांची संख्या वाढली आहे. परवाना असणार्‍या सावकारांपेक्षा विनापरवाना सावकारांचीही संख्या मोठी आहे. सध्या सांगली जिल्ह्यात 400 हून अधिक परवाना असणारे सावकार आहेत. त्यामध्ये सर्वात जास्त सावकार हे मिरज तालुक्यात आहेत. सावकार मिरज शहराबरोबरच ग्रामीण भागातही आहेत.  

परवाना असणार्‍या सावकारांची तपासणी करण्याचे अधिकार सहकार उपनिबंधक आणि पोलिसांना आहेत. बेकायदा काम करणार्‍या सावकारांवर 1946 सालच्या मुंबई सावकारी अधिनियमानुसार कारवाई केली जाते. वास्तविक या कायद्यात काही बदल करण्याची गरज आहे. 2001 ते 2003 या वर्षात बेकायदेशीर सावकारांनी धुमाकूळ घातला होता. आता पुन्हा या सावकारांचा नांगा मिरजेतील गरिबांना डसतो आहे. या सावकारांनी अनेकांच्या शेतजमिनी, प्लॉट, प्लॅट, घर अशा मालमत्ता हडप केलेल्या आहेत. गरजूंना कर्जे देऊन त्यांच्या मुंड्या मुरगाळून अनेकजण गब्बर झाले आहे. मुलांची लग्ने, कार्यक्रम, शिक्षण, रुग्णालयाचा खर्च, निवडणुका यासह अनेक कारणांसाठी या सावकारांकडून कर्जे घेतली जातात.  परतफेड केली नाही तर त्यांच्या मालमत्ता हडप केल्या जातात. वास्तविक परवाना असणार्‍यांनीच कायद्या प्रमाणे कर्ज द्यावे. मात्र परवाना नसणारे बेकायदा सावकार कर्ज देतात. सावकार महिन्याला 10 टक्क्यांपासून 25 टक्क्यांपर्यंत व्याज घेतात. काही सावकारांचे व्याज घेण्याचा कालावधी हा दररोज, आठवड्याला तर काहींचा पंधरा दिवसांचा आहे. जर हे व्याज मिळाले नाही तर त्या व्याजावरही चक्रवाढ व्याज घेतात. त्यामुळे मुद्दलाच्या कितीतरी पटीने व्याज घेतले जाते. या सावकारांकडे या कर्जाच्या वसुलीसाठी तशी तगडी यंत्रणाही आहे. 

मिरजेत सावकार किती बळी घेणार ?

सावकारी पाशामुळे मिरजेत अनेकांचे बळी गेले आहेत. गेल्या वर्षभरात सावकारांच्या जाचाला कंटाळून मिरजेत तिघांनी आत्महत्या केली आहे. दि. 30 ऑक्टोबर 2017 रोजी मेडिकल व्यावसाईक अभिजित पाटील याने आत्महत्या केली. त्याच्या पत्नीने त्यानंतर आत्महत्या केली. अभिजितच्या वडिलांनी धाडसाने तक्रार दिल्याने पोलिसांनी मिरज व जयसिंगपूरच्या सावकारांवर गुन्हे दाखल केले. दि. 26 ऑक्टोबर 2017 रोजी मिरजेत मयूर कुंभार या तरूणाने सावकाराला कंटाळून आत्महत्या केली होती. त्याच्या पत्नीने धाडसाने तक्रार दिल्याने पोलिसांनी मिरजेतील दोघा सावकारांना अटक केली होती. आता मिरजेतीलच रविंद्र बुरजे हा तरूण व्यापारी सावकारांमुळे बेपत्ता झाला आहे.  हा जाच थांबणार कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.