Mon, Jul 06, 2020 18:39होमपेज › Sangli › मराठा आरक्षणाचे जल्लोषी स्वागत

मराठा आरक्षणाचे जल्लोषी स्वागत

Published On: Nov 30 2018 1:27AM | Last Updated: Nov 29 2018 8:57PMसांगली : प्रतिनिधी

मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात गुरूवारी मंजूर झाले. त्यानंतर या निर्णयाचे सांगली जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्ष, विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधींसह मराठा समाज बांधवांनी जल्लोषी स्वागत केले. मराठा समाजाचा आरक्षणासाठी दीर्घकाळ शांततेने आणि सनदशीर मार्गाने लढा सुरू होता. या संघर्षाला यश आले. यातून मराठा समाजाला प्रगतीची संधी खुली होईल, अशी प्रतिक्रिया यानिमित्ताने उमटली.

दै. ‘पुढारी’मुळेच मराठा आरक्षणास बळ

मराठा आरक्षणाचा लढा गेली चाळीस वर्षे सुरू आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक  डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे मराठा आरक्षणाला मोठे बळ मिळाले. मराठा आरक्षण मिळण्यात दै. ‘पुढारी’चा सिंहाचा वाटा आहे. मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्वच जाती, जमातीच्या बांधवांचे सहकार्य लाभले आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 40 बांधवांना मराठा बांधवांचे स्मरणही यानिमित्ताने महत्त्वाचे आहे.  समाजाच्या या संघर्षाला यश आले आहे. या आधी अनेक वर्षांपासून सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र आता आरक्षणामुळे मराठा तरुणांना, तरुणींना शिक्षणासह शासकीय सेवेत संधी मिळण्यास मदत होणार आहे.सरकारने सांगितल्याप्रमाणे या आरक्षणासाठी आता कायदेशीर काही समस्या येणार नाही. यामुळे यापुढे मराठा समाजाला प्रगतीची संधी खुली होण्यास मदत होणार आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.त्यांच्या प्रयत्नामुळेच कायद्याच्या चौकटीत बसवून विधिमंडळाने एकमताने ठराव केला.     
                             - किरण पाटील, जिल्हाध्यक्ष मराठा सेवा संघ

मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय

भाजप, शिवसेना महायुती सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. खर्‍या अर्थाने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला मोठा लाभ होणार आहे. सकल मराठा क्रांती मोर्चाच्या महालढ्याने मराठा समाजासाठी आरक्षणाच्या रूपाने सुवर्णपहाटच ठरली आहे. मुख्यमंत्री  फडणवीस यांनी शब्द खरा केला आहे.   
                                 - खासदार संजय पाटील
 

आरक्षण संघर्षाशिवाय हवे होते

आरक्षणाला भाजप सरकारने चार वर्षे उशीरच केला आहे. हे आरक्षण संघर्षाशिवाय मिळायला हवे होते. मात्र समाजाला आरक्षणासाठी चार वर्षे संघर्ष करावा लागला. आरक्षणाच्या विधेयकाला आम्ही सर्वांनी एकमताने पाठिंबा दिल्यानेच विधेयक मंजूर  झाले. हे आरक्षण न्यायालयातही टिकायला हवे.
                                - आमदार जयंत पाटील 

भाजपने शब्द पाळला

मराठा शेतकरी, कष्टकरी मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे. त्याला आरक्षणाची वर्षानुवर्षे गरज होती. परंतु राजकीय इच्छाशक्तीअभावी ते मिळत नव्हते. भाजपने गेल्या निवडणुकीत शब्द दिला आणि तो आज आरक्षण जाहीर करून पाळलाही. आरक्षणाबाबत कोणताही कायदेशीर अडसर नको यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  सर्वेक्षण, अहवालासह कृती आराखडा तयार केला. भाजप सरकारच्या अनेक लोकहिताच्या निर्णयांपैकी हा एक आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेप्रमाणे आरक्षणाची अंमलबजावणी ताकदीने होईल.
                              - आमदार सुधीर गाडगीळ
 

भाजपने शब्द पाळला

मराठा आरक्षण देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला न्याय दिला आहे. फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मराठा आरक्षणाचा  शब्द पाळला. फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन. हे आरक्षण न्यायालयात टिकेल याची  काळजी सरकारने घेतली आहे.
                              - पृथ्वीराज देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष 

मराठा समाजाला लाभ 

बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाले,  ही अभिनंदनाची बाब आहे. भाजपने मोठे धाडस करून ते दिले. हा ऐतिहासिक निर्णय केवळ भाजपनेच घेतला आहे. जे खरोखरच मागासलेले आहेत त्यांना आरक्षणाचाही लाभ दिला आहे. सबका साथ, सबका विकास हे भाजपने या निर्णयातूनही दाखवून दिले.
                              - महापौर, सौ. संगीता खोत 

सनदशीर लढ्याचे यश

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत 16 टक्के आरक्षणाचे विधेयक विधानसभा व विधानपरिषदेत एकमुखी मंजूर झाल्याबद्दल महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री व सर्व आमदारांचे अभिनंदन आहे. आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांनी राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे काढले. सनदशीर मार्गाने लढा उभारला. त्याला यश आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदारांचे विशेेष आभार आहेत. 
                              - संग्रामसिंह देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली

मराठा समाजाला संधी

मराठा आरक्षण हा मराठा समाजाच्या दृष्टीने अतिशय चांगला निर्णय आहे.  समाजाने आजपर्यंत ऐक्याचे दर्शन घडवून एकजुटीने आंदोलन केले. त्याला यश आले आहे. केवळ आरक्षण मिळाले म्हणून न थांबता उद्योग, व्यापार, व्यवसाय यासह सर्वच क्षेत्रात कौशल्य दाखवून अव्वल रहावे. 
                              - दिलीप पाटील,  अध्यक्ष, सांगली जिल्हा बँक

समाजाला न्याय 

विधेयक मंजूर झाल्याबद्दल ‘भाजप-शिवसेना’ युती सरकारचे अभिनंदन आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा शब्द पाळला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकार, सर्व आमदार, मराठा आरक्षणासाठी सहकार्य दिलेल्या सर्वच समाजघटकांचे अभिनंदन आहे. विस्कटलेला मराठा समाज मराठा आरक्षणाच्या निमित्ताने एकत्र आला. या एकीचे हे यश आहे. 
                               - सुहास बाबर, उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, सांगली

सरकारचे अभिनंदन

मराठा आरक्षणाचा निर्णय स्वागतार्ह आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर झाल्याबद्दल सर्व आमदारांचे अभिनंदन आहे. मराठा समाजाला काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने आरक्षण दिले होते. त्यापेक्षा वेगळे व कोर्टात टिकण्यासारखे आरक्षण दिलेले असेल तर त्याचे स्वागतच आहे. 
                              विलासराव शिंदे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी

महत्त्वाचा निर्णय

मराठा समाजाला आरक्षणाचे विधेयक मंजूर होणे हे मराठा समाजासाठी अत्यंंत महत्त्वाचे ठरणार आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाने संयमाने आंदोलन केले. आता  विधीमंडळाने आरक्षणाचे विधेयक एकमताने संमत केल्यामुळे मराठा समाजाला खर्‍या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र सरकारने सांगितल्याप्रमाणे या आरक्षणासाठी आता कायदेशीर काही समस्या येणार नाही. यामुळे यापुढे मराठा समाजाला प्रगतीची संधी खुली होण्यास मदत होणार आहे.  
                         - माजी आमदार, मानसिंगराव नाईक

आरक्षण कायम रहावे

मराठा समाजाला मागील सत्तेतच काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीने आरक्षण दिले होते. भाजपने आता त्यावर शिक्कामोर्तब केले.  आता नोकरी, शिक्षण आरक्षण दिले आहे, पण आर्थिक निकषाची अट घातली आहे. मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून आहे. त्यामुळे अल्प किंवा बहुभूधारक असला तरी निसर्गावर त्याचे उत्पन्न अवलंबून असते. त्यामुळे ही उत्पन्नाची अट न घालता सरसकट आरक्षण द्यावे. शिवाय उद्या कायदेशीर अडचणी होऊ नयेत. ते टिकून त्याचा लाभ मिळावा, याचीही शासनाने खबरदारी घ्यावी.
                          - पृथ्वीराज पाटील,  काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष

क्रांतीमोर्चा, ‘पुढारी’चे यश

कोपर्डे प्रकरणानंतर खर्‍या अर्थाने मराठा समाज एकवटला. तेथून मराठा क्रांतीमोर्चाचा एल्गार राज्य नव्हे तर देशव्यापी ठरला. या लढ्याला  दै. ‘पुढारी’ आणि संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मोठी ताकद दिली. आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत बैठकांद्वारे त्याला गतीही दिली. आता सरकारने  आरक्षणावर शिक्कामोर्तब केले आहे. याच पध्दतीने लिंगायत, धनगर आरक्षणाचाही प्रश्‍न मार्गी लावावा.
                          - माजी आमदार नितीन शिंदे