Mon, Jul 06, 2020 17:19होमपेज › Sangli › प्रचंड उत्साहात नवमतदारांकडून मतदान

प्रचंड उत्साहात नवमतदारांकडून मतदान

Published On: Apr 24 2019 1:41AM | Last Updated: Apr 23 2019 11:04PM
सांगली : प्रतिनिधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणार्‍या तरुणांत मोठा जोश दिसून आला. मतदान सुरू झाल्यापासून सकाळच्या टप्प्यातच सर्वत्र तरुणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच मतदान केंद्रावर सेल्फी काढून सोशल मीडियावर अपलोड करुन पहिल्या मतदानाचा आनंद लुटला.या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत तरुण मतदारांची नोंद लक्षणीय झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक तरुण मतदारांच्या  भोवतीच  फिरणार हे निश्‍चित होते. लोकसभा निवडणुकीची मदार ही तरुणांवर असल्याने राजकीय पक्षांकडून देखील तरुण मतदारांनाच ‘हायजॅक’ करण्यात आले होते.

यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्षांच्या तरुणांची बी टीम दिसून आली. त्यांच्यात मतदानाची प्रचंड ओढ दिसून आली. त्यामुळे या नवीन तरुण मतदारांमुळे मतदानाची टक्केवारी देखील निश्‍चितच वाढणार आहे. देशाचे नेतृत्व कोणाच्या हाती असावे हे आता तरुण मतदारच ठरविणार आहेत. त्यामुळे आपणच आपला नेता व देशाचा पंतप्रधान कसा असावा हे तरुणांनी ठरवणारी निवडणूक बनली आहे. या मागे तरुणांच्या अपेक्षा व तरुणाईला देशाचे राजकारण कसे हवे आहे. याचेच राजकारण दडले असल्याचे दिसून येते.
या पूर्वीची निवडणूक जरा वेगळ्या प्रकारची होती. घरचे लोक सांगतील त्यांना मतदान करुन तरुणाई मोकळी व्हायची. तसेच फक्त गावापुरते राजकारण करुन तरुणाई मोकळी व्हायची. परंतु आता तरुणाई देशाच्या राजकारणाचा विचार करू लागली आहे. आपले एक मत देश हितासाठी किती महत्वाचे आहे. हे आता तरुणाईला चांगलेच समजले आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मिळणारी सुट्टी आता वाया न घालवता तरुणाईने सर्वात पहिला आपले मतदान करुन इतरांकडून मतदान घेण्यासाठी तरुणाईने पुढाकार घेतला आहे.
मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणारे बुथ देखील तरुणांनीच ताब्यात घेतले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत तरुणांबरोबर तरुणी देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. बुथवर देखील तरुणींनी आपली हजरे लावली होती.  येणार्‍या-जाणार्‍या वयस्क लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह निर्माण करीत होत्या. तसेच आता जे मतदान करणार नाहीत त्यांना देखील या तरुणाईने   मतदान करा. तो आपला हक्क आहे असे म्हणून  मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विनवनी करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत असून पहिल्या मतदानाचा आनंद मात्र तरुणांच्यात उत्साहाने दिसत होता.

सेल्फी विथ वोट

पहिल्यांदा मतदान केले आणि सेल्फी काढली नाही. असे कदापिही होणार नाही. त्यामुळे पहिल्यांदा मतदान केल्यानंतर लगेच मतदान केंद्राबाहेर येऊन ‘सेल्फी विथ वोट’ असे स्टेटस ठेवून तरुणाई लगेच सोशल मीडियावर फोटो अपलोड करुन प्रथम मतदानाचा आनंद लुटत होती.