होमपेज › Sangli › विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत?

विशाल पाटील बंडखोरीच्या तयारीत?

Published On: Mar 24 2019 1:19AM | Last Updated: Mar 24 2019 1:19AM
सांगली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानीकडे जाण्याची शक्यता वाढल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत नाराजी पसरली आहे. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. त्यासाठी रविवारी (दि. 24) दादाप्रेमींचा मेळावा आयोजित केला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यावरून वाद सुरू आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला विरोध केला आहे.  काँग्रेसतंर्गतही विशाल व आमदार विश्‍वजित कदम यांच्यात वादविवाद उफाळून आला आहे. ज्येष्ठ नेते  मोहनराव कदम यांनी  यात लक्ष घालून वादात मध्यस्थी करण्याबरोबर ही जागा काँग्रेसकडेच राहण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.  पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची शनिवारी मुंबईत बैठक झाली. यात सांगलीच्या जागेबाबत निर्णय झाला नाही. 

सांगाली जिल्ह्यातील काँग्रेस विशेषत: वसंतदादा प्रेमी कार्यकर्त्यांत संताप व संभ्रम आहे. दादा घराण्याविषयी सहानूभुतीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे  सांगलीची जागा हातातून जाऊ नये म्हणून विशाल पाटील यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.  त्यासाठी शनिवारी वसंतदादा साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसवर सांगलीतील 21 नगरसेवकांची बैठक झाली. नगरसेवकांनी सह्यांचे निवेदन पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविले आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच ठेवण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

त्यामुळे विशाल पाटील हे निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. शहराबरोबरच  ते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचेही मत आजमविणार आहेत. त्यासाठी त्यांनी दादाप्रेमींचा मेळावा रविवारी (दि.24) आयोजित केला आहे. सायंकाळी 4 वाजता वसंतदादा समाधीस्थळावर हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.  

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex