Mon, Jul 13, 2020 06:14होमपेज › Sangli › कामेरीत ‘राजारामबापू’चे गट कार्यालय पेटविले

कामेरीत ‘राजारामबापू’चे गट कार्यालय पेटविले

Published On: Nov 10 2018 1:14AM | Last Updated: Nov 09 2018 11:58PMइस्लामपूर : वार्ताहर

वाळवा तालुक्यात ऊस दर आंदोलन चिघळू लागले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. गुरूवारी रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अज्ञात कार्यकर्त्यांनी राजारामबापू कारखान्याचे कामेरी येथील गट कार्यालय पेटविले. तर आष्टा येथे हुतात्मा कारखान्याकडे ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरच्या टायर पेटवून दिल्या. 

गुरूवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास कामेरी येथील राजारामबापू कारखान्याच्या गट कार्यालयाच्या  बंद दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात आंदोलकांनी कार्यालयात प्रवेश केला.   कार्यालयात गठ्ठे बांधून ठेवलेली जुनी कागदपत्रे टेबलावर ओतून ती पेटवून दिली. हे कार्यालय पुणे-बंगळूर महामार्गावरील उड्डाण पुलाजवळ  लोकवस्तीतच आहे. कार्यालयातून धुराचे लोट येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात हा प्रकार आला. काहींनी पाणी ओतून ही आग विझविली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारखान्याचे अधिकारीही तातडीने दाखल झाले. या आगीत जुनी कागदपत्रे तसेच दोन स्लीप बुक जळाली.  अन्य महत्त्वपूर्ण कागदपत्रे तिजोरीत असल्याने ती सुरक्षित राहिली. 

याप्रकरणी शेती अधिकारी प्रशांत पाटील यांनी अज्ञातांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यापूर्वीही ऊस दर आंदोलनावेळी कुरळप येथेही राजारामबापू कारखान्याचे कार्यालय अज्ञातांनी पेटविले होते. दरम्यान, गुरूवारी रात्रीच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा येथे हुतात्मा कारखान्याकडे  निघालेला ऊसाचा ट्रॅक्टर अडवून  टायर पेटविल्या. दोन दिवसांपूर्वीही तांदुळवाडीजवळ उसाचा ट्रॅक्टर पेटविण्याचा प्रयत्न झाला होता. ऊस दरावर 
तोडगा निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.