Sun, Jul 05, 2020 14:40होमपेज › Sangli › विधानसभा निवडणूक भाजपला पुन्हा सुकर

विधानसभा निवडणूक भाजपला पुन्हा सुकर

Published On: May 25 2019 2:10AM | Last Updated: May 24 2019 11:33PM
मिरज : जालिंदर हुलवान

महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांनी सांगली मतदारसंघात दुसर्‍यांदा विजय मिळवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणि पर्यायाने मिरजेत पुन्हा भाजपची ताकद वाढली आहे. या निवडणुकीमुळे आगामी मिरज विधान सभा निवडणुकीसाठी भाजपचा मार्ग अधिक सुकर झाला आहे असे मानले जाते. आमदार सुरेश खाडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी खासदार पाटील यांच्यासाठी काम केल्याने विधानसभेच्या निवडणुकीत तो  पैरा पाटील यांनी  फेडावा लागणार आहे. 

एकेकाळी मिरज हा काँग्रेसचा बाले किल्ला समजला जायचा. येथील जनतेने आत्तापर्यंत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसलाच साथ दिली होती. विधासभा निवडणुकांतही यापूर्वी अनेकदा  काँग्रेसनेच विजय मिळवला होता.मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीपासून मात्र इथले चित्र सतत बदलले गेले आहे.

 2009 मध्ये राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. त्यावेळी भाजपचे आमदार  खाडे   मिरजेत निवडून आले होते. तत्पूर्वी ते जत मधून भाजपचेच आमदार होते. 2009मध्ये  जिल्ह्यात  भाजपचे दोन आमदार निवडून आले. 2014 मध्ये  मोदी लाटेत प्रथमच भाजपला सांगली लोकसभा मतदारसंघात  विजय मिळाला.  संजय पाटील निवडून आले. 

2014 च्या निवडणुकीत मिरज विधानसभा मतदार संघात 49 हजारांचे मताधिक्य  पाटील यांना मिळाले होते. अर्थात त्यावेळीही त्यासाठी  आमदार खाडे यांचा पुढाकार होताच. त्यानंतर  विधानसभा निवडणुकीत आमदार खाडे तिसर्‍यांदा निवडून आले. त्यांनी आमदारकीची हॅट्ट्रीक केली होती. 

त्या निवडणुकीमध्ये काँग्रेससह सर्व उमेदवारांना अनामतही वाचविता आली नव्हती.  त्यामुळे खाडे यांना  युती सरकारमध्ये भाजपकडून मंत्रीपद मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र अखेरपर्यंत त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. अर्थात त्यासाठी भाजपमधीलच काहीजण कार्यरत होते. 

त्यानंतर मार्च 2017 मध्ये जिल्हापरिषद व पंचायत समित्यांची निवडणूक झाली. जिल्हापरिषदेत प्रथमच  भाजपची सत्ता आली. मिरज विधानसभा मतदार संघाच्या कार्यकक्षेत सात जिल्हापरिषद मतदार संघ आहेत. त्या सातपैकी पाच ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे जिल्हापरिषदेमध्येही भाजपची ताकद वाढली.

 जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांपैकी मिरज, जत, पलूस, कडेगाव, आटपाडी या पाच ठिकाणी भाजपचा झेंडा फडकला. मिरज पंचायत समितीमध्ये भाजपच्या जनाबाई या सभापती आणि काकासाहेब धामणे हे उपसभापती झाले. मिरज पंचायत समितीमध्ये भाजपचे दहा सदस्य निवडून आले होते. 

सभापती व उपसभापती निवडणुकीच्यावेळीही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी खासदार पाटील व आमदार  खाडे यांच्यातील  राजकीय संघर्ष  पुढे आला होता. त्यानंतर खासदार व आमदार यांच्यामध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे या  निवडणुकीमध्ये खासदार पाटील यांचे काम करण्यास आमदार खाडे यांचे समर्थक फारसे इच्छुक नव्हते. मात्र खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. खासदार पाटील आणि  आमदार खाडे यांच्यातील वाद मिटविला होता. त्यामुळे या निवडणुकीत आमदार खाडे व त्यांचे कार्यकर्ते  ताकदीने उतरले. 

 या निवडणुकीमध्ये  आमदार खाडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चांगले काम केले.  आता  विधानसभा निवडणूक होणार आहे.  त्या निवडणुकीत भाजपतर्फे आमदार खाडे हेच उमदेवार असतील हे निश्‍चित आहे.  आता या निवडणुकीत त्यांनी केलेली मदत खासदार पाटील यांना विधानसभा निवडणुकीत लक्षात ठेवाली लागेल.  

वंचितची भिती..

वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर हे प्रथमच लोकसभा निवडणुकीत लढले. त्यांनाही चांगली मती मिळाली आहेत. भाजपवर नाराज असलेल्यांची व काही प्रमाणात काँग्रेसची मतेही वंचित आघाडीच्या बाजूला गेली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही आघाडीचा प्रभाव या मतदारसंघात राहणार हे निश्चित  आहे.
 
काँग्रेसला मोठी तयारी करावी लागणार..

गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपवर कुरघोडी करायचा प्रयत्न केला.आमदार  खाडे यांच्यावर सातत्याने टीका केली. पंचायत समितीच्या माध्यामातून विरोध केला. परंतु त्यामुळे भाजपच्या प्रभावात  काही फरक  पडलेला दिसत नाही. त्यामुळे  विधान सभा निवडणुकीसाठी काँग्रेसला मिरजेत फार मोठी तयारी करावी लागणार आहे. 


लोकसभा झाली...आता विधानसभा...

2009च्या निवडणुकीत मिरजेत भाजपने विजय मिळवला.त्यानंतर अनेक ग्रामपंचातीमध्ये भाजपचा झेंडा फडकला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत  भाजपच विजेता ठरला. 2014 मध्ये पुन्हा भाजपने  विधानसभा निवडणूक जिंकली.  2017 मध्ये मिरज पंचायत समितीत सत्ता मिळवली.जिल्हापरिषदेवर झेंडा फडकला. 2018 मध्ये  महानरपालिका निवडणूकीत मिरजेत भाजपचे 12 नगरसेवक निवडून आले. आता  या लोकसभा निवडणुकीत भाजपनेच विजय मिळवला.  आता  भाजपने  विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.