Thu, Jul 02, 2020 10:48होमपेज › Sangli › संखजवळ दुचाकी अपघातात दोघे ठार

संखजवळ दुचाकी अपघातात दोघे ठार

Published On: Dec 21 2018 1:28AM | Last Updated: Dec 21 2018 1:28AM
उटगी :  वार्ताहर 

संख (ता. जत) येथे  मोटारसायकल अपघातात दोघे जण जागीच ठार झाले. हा अपघात बुधवारी रात्री उशिरा संख-तिकोंडी रस्त्यावर तलाव फाटा येथे झाला. सुहास दशरथ गंभीरे (वय 27, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) आणि भालचंद्र सिद्राम तिगनीबिद्री (वय 37, दत्तनगर बामणोली, मूळ गाव नंदरगी, ता. इंडी, जि. विजयपूर) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे घरगुती कार्यक्रमाला चालले होते. उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

भालचंद्र तिगनीबिद्री व सुहास गंभीरे (एम एच-10 बीटी 2192) या मोटारसायकलने  नंदरगी येथे चालले होते. संख-तिकोंडी रस्त्यावर तलाव फाटा येथे मोठे वळण आहे. तेथे मोटारसायकलवरील ताबा सुटला आणि ते घसरून रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन पडले. खड्ड्यामध्ये मोठे दगड आहेत. त्या दगडांवर  या दोघांचे डोके आपटले. छाती आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात  झाला. रात्री उशिरा अपघात झाल्याने कुणाच्या लक्षात आला नाही. या रस्त्यावर रात्री अकरानंतर फारशी वर्दळ नसते. सकाळी ग्रामस्थांनी उमदी पोलिस ठाण्यात कळवले. मात्र, या दोघांचा रक्तस्त्राव होऊन मृत्यू झालेला होता. दोघांची लवकर ओळख पटली नाही. पोलिसांनी आधारकार्डवरून ओळख पटवली. तिगनीबिद्री हे कुपवाड येथील बी. आर. इंजिनिअरिंग कंपनीचे मालक होत. सुहास गंभीरे हे मूळचे बीड येथील आहेत. मराठा स्वराज्य संघाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते काम करीत होते.