Thu, Jul 16, 2020 00:19होमपेज › Sangli › सांगली लोकसभेचे आज चित्र स्पष्ट होणार

सांगली लोकसभेचे आज चित्र स्पष्ट होणार

Published On: Apr 08 2019 2:02AM | Last Updated: Apr 07 2019 11:26PM
सागंली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज माघार घेण्याचा उद्या (दि. 8) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी निवडणुकीचे चित्र स्पष्ट  होणार आहे. 20 पैकी किती उमेदवार माघार घेणार आणि किती प्रत्यक्ष निवडणूक लढवणार याची उत्सुकता आहे. 

सांगली लोकसभेसाठी विद्यमान खासदार संजय पाटील यांनी सहा महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली. मात्र दुसर्‍या बाजूला कोण निवडणूक लढवणार हे स्पष्ट होत नव्हते. त्यामुळे निवडणूक एकतर्फीच होणार असे सुरुवातीस वाटत होते. काँग्रेसतर्फे निवडणूक लढवण्यास कोणी इच्छुक नसल्याने ही जागा स्वाभिमानी पक्षाला देण्यात आली. अखेरीस वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी स्वाभिमानीतर्फे अर्ज दाखल केला. 

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक लढवणार अशी घोषणा केली होती. मात्र ते निवडणूक लढवणार का? कोणत्या पक्षातून लढवणार याबाबत अनेकजण प्रश्‍न उपस्थित  करीत होते. मात्र  शेवटच्या टप्यात मोठे शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणुकीत आता चुरस निर्माण झाली आहे. तिरंगी आणि चुरशीची निवडणूक होणार असे सध्याचे चित्र आहे. 

वीस उमेदवारांचे  अर्ज  वैध ठरले आहेत.   त्यापैकी तेरा अपक्ष उमेदवार आहेत. निवडणुकीत अनेकजण अर्ज भरतात. मात्र  त्यापैकी काहीजण माघारही घेतात, असा आतापर्यंतची स्थिती आहे. त्यामुळे उद्या कितीजण माघार घेणार आणि कितीजण निवडणूक लढवणार याची उत्सुक्ता असणार आहे.  महाराष्ट्र क्रांती सेनेतर्फे ऋषीकेश साळुंखे, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे राजेंद्र कवठेकर, बळीराजा पार्टीतर्फे आनंदा नालगे, बहुजन समाज पार्टीचे शंकर माने  यांचेही अर्ज आहेत. ते निवडणूक लढवणार की माघार घेणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.