Wed, Jul 15, 2020 16:07होमपेज › Sangli › सांगली, हातकणंगले खासदार ठरविण्यासाठी आज मतदान

सांगली, हातकणंगले खासदार ठरविण्यासाठी आज मतदान

Published On: Apr 23 2019 1:37AM | Last Updated: Apr 22 2019 11:06PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघांचा खासदार ठरविण्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. सांगलीत 12 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडीसह विविध पक्ष, आघाड्या आणि अपक्ष उमेदारांचा समावेश आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूणच प्रचाराचा धडाका आणि त्यादृष्टीने मोर्चेबांधणीमुळे निवडणुकीत चुरस आहे. 

महायुतीकडून विद्यमान खासदार संजय पाटील यांना पुन्हा मैदानात उतरविण्यात आले आहे. यावेळी काँग्रेस मैदानात नाही. अनेक घडामोडींनंतर त्याऐवजी महाआघाडीचा घटकपक्ष स्वाभिमानीपक्षाकडून युवानेते विशाल पाटील हे मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर लढत देत आहेत. नऊ अपक्षांसह 12 जण मैदानात आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खा. राजू शेट्टी व भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात प्रमुख लढत आहे. 

सांगलीत गेल्या 20-25 दिवसांपासून सर्वांनी आपापल्या परीने प्रचाराचा धडाका लावला होता. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. रविवारी चुरशीने झालेल्या प्रचारानंतर तोफा थंडावल्या होत्या. आता भावी खासदार ठरविण्यासाठी मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत  मतदान होणार आहे.

 एकूण 18 लाख 3 हजार 54 मतदार  आहेत. 1 हजार 848 मतदान केंद्रांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी 11 हजार 339 कर्मचारी व  अधिकारी मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविणार आहेत. पारदर्शी मतदान प्रक्रियेसाठी पहिल्यांच अशा प्रकारची यंत्रणा राबविण्यात येणार आहे. सोबत सर्वच पक्षांकडून जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी बूथची यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे.  एकीकडे जास्तीत जास्त मतदान मिळविण्यासाठी त्या-त्या पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा, महापालिका, तालुका प्रशासनाने मतदान जागृती, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महिनाभर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. मतदान हा लोकशाहीचा उत्सव समजून मतदान करावे, असे आवाहनही करण्यासाठी रॅली, व्होट फॉर रन असे विविध उपक्रमही राबविले आहेत.